आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग समिती निवडणूक : सभापतीपदासाठी रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटी, सिडको व नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे.
नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदासाठी सोमवारी दुपारी 12.30 वाजता प्रभाग समिती कार्यालयात निवडणूक होत आहे. त्यासाठी पाच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग समितीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय व अपक्ष मिळून 16, तर मनसे व भाजपा युतीचे 8 सदस्य आहेत.सर्वाधिक सात नगरसेवक असताना गेल्या वर्षी शिवसेनेने सर्मथन देणार्‍या अपक्ष उमेदवाराला सभापतीपद दिले होते. यावेळी शिवसेनेने सभापतीपदावर दावा केला असून, प्रभाग 61 च्या नगरसेविका सुनीता कोठुळे यांना संधी दिली आहे. दुसरा मोठा पक्ष असलेल्या मनसेचे सहा नगरसेवक असून त्यांनी संपत शेलार, शोभना शिंदे यांचे अर्ज दाखल केले आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेसने कन्हैया साळवे, राष्ट्रवादीने शोभा आवारे, तर आरपीआयचे सुनील वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेसोबत असलेल्या भाजपाने सविता दलवाणी यांचा अर्ज दाखल करून निवडणूक चुरशीची केली आहे.


सभापतींची अनुपस्थिती?

नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामुळे विद्यमान सभापती पवन पवार न्यायालयीन कोठडीत असल्याने निवडणुकीला त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळे शिवसेना युतीचे एक मत कमी होणार आहे. शिवसेना युतीच्या विजयावर परिणाम होणार नसल्याने घटक पक्षांच्या माघारीसाठी शिवसेनेला तडजोडी करावी लागणार आहे.


सिडकोतील इच्छुक
अरविंद शेळके, रत्नमाला राणे (मनसे), राजेंद्र महाले (राष्ट्रवादी), कल्पना पांडे, उत्तम दोंदे (सेना)

असे आहे बलाबल
मनसे 7 सेना 7 राष्ट्रवादी 3
काँग्रेस 2 माकप 1 जनराज्य 2

सिडको मनसेकडे जाण्याची शक्यता

सिडको प्रभाग सभापती निवडणूक अटीतटीची होणार असून मनसेसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसही निवडणूक रिंगणात आहे. मागील सभापतीपद शिवसेनेकडे गेल्याने या निवडणुकीत मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी झाली आहे. मागील निवडणुकीसारखी अनोखी युती यावेळी बघण्यास मिळण्याची शक्यता आहे. सिडको प्रभाग सभापतीपदाच्या गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, जनराज्य, माकप, आणि कॉँग्रेसमध्ये अनोखी युती झाली होती. निवडणुकीत मनसेला हार पत्करावी लागली होती. यावेळी सर्वच राजकीय समीकरणे बदली असल्याने सत्ताबदलाची शक्यता आहे. मनसे आणि सेना युती झाल्यास सभापतीपद मनसेकडे जाऊ शकते.


पंचवटीतील संख्याबळ
7 भाजपा
7 मनसे
2 कॉग्रेस
5 राष्ट्रवादी
1 सेना
2 अपक्ष


पंचवटीत अविरोध निवड शक्य

पंचवटी प्रभाग सभापती निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. येथे मनसे आणि भाजपाचे संख्याबळ पुरेसे असून सभापतीपद भाजपाकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथे मनसे आणि भाजपाचे सात, सात सदस्य आहेत. भाजपाचे प्रा. परशराम वाघेरे हे सभापती असून पक्षाने त्यांचा अर्ज दाखल केला आहे. मनसेकडून लता टिळे, मीनाताई माळोदे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून वेळेवर सिंधूताई खोडे, शालिनी पवार यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पवार आणि खोडे यांनी नकार दिला तर पुन्हा प्रा.वाघेरे यांच्या गळ्यात सभापतीची माळ पडण्याची शक्यता पक्षर्शेष्ठीकडून व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम प्रभागावर मनसेने पुन्हा दावा केल्यास पंचवटी प्रभागाकरीता मीनाताई माळोदे यांचे नाव सर्वात पुढे असून त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.