आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाडी : अपव्ययाचा वारू मोकाटच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरभर पाणी बचतीचा जागर सुरू असला आणि पाणी कपातही लागू होणार असली, तरी महापालिकेच्याच कर्मचा-यांकडून पाण्याचा कसा अपव्यय सुरू आहे, याचे चित्र ‘दिव्य मराठी’च्या हाती आले आहे. एका बाजूला पाण्याचा वापर जनतेने काटकसरीने करावा आणि झाडांना पाणी घालण्याकरिता वापरलेल्या पाण्याचाच पुनर्वापर करावा, अपव्यय केला गेला, तर कारवाईचे इशारेही दिले जात आहेत. दुसरीकडे मात्र महापालिकेच्या उद्यानांतील हिरवळ टवटवीत राहावी, याकरिता सर्रास हजारो लिटर पाणी वाया घातले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पावसाळा लांबल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, पाण्याचा वापर तूर्तास केवळ पिण्यासाठीच केला जावा, असे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. शहरात ‘दिव्य मराठी’कडून पाणी बचत अभियान राबविले जात असून, महानगरात एकवेळ पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 7 जुलैपासून ते लागू होण्याची स्थिती आहे. ही गंभीर स्थिती समजावून घेत नागरिकांकडून स्वत: पुढाकार घेत पाणी बचतीचा संकल्प केला जात आहे.
जुने नाशिक आणि सातपूरमध्ये पाणी बचतीकरिता शाळांपासून ते गल्लीपर्यंत पाणी बचतीचा मंत्र देणारे जनजागृती अभियान तेथील नगरसेवकांकडून राबविले जात असतानाही महापालिकेच्याच कर्मचा-यांत पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे, याचाही प्रत्यय गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला आला. खासगी पाणीपुरवठा करणा-या टँकर्समधून रस्त्यावर अक्षरश: सांडणा-या पाण्यामुळे पडणारा सडा आणि महापालिकेच्या शिवाजी गार्डनमध्ये हिरवळीवर मारले जाणारे हजारो लिटर पाणी ही विदारक दृश्ये निश्चित भूषणावह ठरणारी नाहीत.

बोअरवेलचा वापर व्हावा
- उद्याने हिरवी राहणे गरजेचे असून, त्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला गेला पाहिजे. जे कर्मचारी पाण्याचा अपव्यय करीत असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रत्येकाने पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे आहे, तरच पाण्याचे दुर्भिक्ष आपल्याला टाळता येणे शक्य आहे. सीमा हिरे, नगरसेविका

अधिका-यांना शिस्त लावावी
- एकीकडे जनतेला एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आपण घेत असताना पाणी बचतीबाबत महापालिकेच्या अधिका-यांनाही शिस्त लावणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा विभागासह उद्यान विभागाच्या अधिका-यांना याबाबत कडक सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. अ‍ॅड. तानाजी जायभावे, गटनेता, माकप

फोटो - शिवाजी उद्यान : पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडूनच निष्काळजीपणे सुरू असलेला पाण्याचा वापर.