आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात ‘ना वीज, ना पाणी...’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - जुन्या नाशकातील काही भागात सोमवारी (दि. ४) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने सलग तिसर्‍या दिवशी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यातच वीजपुरवठाही खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना ‘ना पाणी, ना वीज’ अशा दुहेरी अडचणीचा सामना करावा लागला. पंचवटी, सातपूर भागातही पाण्याअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

शहरातील काही भागात शनिवारपासून पाणीपुरवठा झालेला नाही. तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका कथडा, नानावली, बागवानपुरा तसेच काठेगल्ली, शंकरनगर, अशोका मार्ग, संताजीनगर या परिसरातील नागरिकांना जास्त बसला. सलग तीन दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने परिसरातील महिला नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागले. दोन दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीच भर पडली. या भागाचा पाणी वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दुहेरी गैरसोय
पाणीपुरवठाही कमी दाबाने, तर दुसरीकडे वीजपुरवठाही झाला नसल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे. नागरिकांच्या होणार्‍या गैरसोयीकडे लक्ष द्यावे. - विशाल कुमावत, नागरिक

अघोषित भारनियमन
जुनेनाशिक, द्वारका, काठेगल्ली आदी भागात दोन दिवसांपासून सकाळच्या सुमारास अचानक वीज गायब होत असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पाण्याअभावी हाल
गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. नेहावाघ, गृहिणी

आरटीओ परिसरातील अश्वमेधनगर, गजवक्रनगर, कर्णनगर, पवार मळा, कॅन्सर हॉस्पिटलशेजारील भाग, सप्तरंग सोसायटी परिसर चार दिवसांपासून पाणी येत नाही. गजवक्रनगर सुमारे १५ वर्षांपासून अस्तित्वात आले असून, आजपर्यंत तेथे जलवाहिनी नाही. नळ जोडणी घेतलेली असूनही तेथील महिलांना हातपंपाद्वारे पाणी मिळवावे लागते.