आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर पुरेल नाशिककरांना ऑगस्टपर्यंत पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहराच्या पाणीपुरवठय़ात आठवड्यातून एक दिवस कपात केल्यास 15 जुलैपर्यंत सुमारे 300 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याची बाब महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पाणी नियोजनाविषयी महापौरांचे ‘वरातीमागून घोडे’ असाच प्रकार असल्याचा आरोप मंगळवारी त्यांनी केला.

प्रभाग 47 मध्ये बडगुजर यांनी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही केली. विरोधी पक्षनेत्याने पाणी कपातीविषयी आधीच निर्णय घेत पाणी बचत करण्याबरोबरच सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले. धरणातील पाणीसाठा आणि उपलब्ध आरक्षण पाहता मागील वर्षाप्रमाणे पाणीटंचाई निर्माण होऊन अधिक पाणी कपातीची नागरिकांवर वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची भूमिका बडगुजर यांनी मांडली आहे. मात्र, याबाबत महापौरांनीही विरोधी पक्षनेत्यावर निशाणा साधत नेमके काय करायचे हे ठरविण्याचा सल्ला दिला होता. मंगळवारी बडगुजर यांनी त्यास उत्तर देत महापौर नियोजन करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका केली.

बडगुजर यांनी सांगितले की, आतापासूनच आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा खंडित केल्यास 14 दशलक्ष घनफुट पाणी बचत होईल. अशा प्रकारे 15 जुलैपर्यंत 300 दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची बचत होईल. त्यामुळे पर्जन्यमान लांबणीवर पडले तरी ऑगस्ट 2013 पर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो, असे सांगत 15 ऑक्टोबर 2012 पासून ते आतापर्यंत 3625 दशलक्ष घनफूटपैकी 1375 दशलक्ष घनफूट इतका पाण्याचा वापर केला आहे. 2225 दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. महिन्याला 400 दशलक्ष घनफूट लागणार्‍या पाण्याचा विचार करता शिल्लक साठय़ातून केवळ 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल. यामुळे तत्काळ नियोजन करण्याची गरज बडगुजर यांनी व्यक्त केली आहे.

देखभाल-दुरुस्तीसाठी मिळेल वेळ
आठवड्यातील एक दिवस पुरवठा खंडित ठेवल्यास जलवाहिन्यांची गळती, जलकुंभाची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी व अभियंत्यांना पुरेसा वेळ मिळेल. शिवाय वीजबिल आणि पाण्याचीही बचत होऊ शकेल.
-सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता

शहराची पाणीपुरवठा स्थिती (दशलक्ष घनफूट)
> एका दिवसाला लागणारे पाणी 13 ते 14
> महिन्याला लागणारे पाणी 400 ते 420
> शिल्लक असलेले आरक्षण 2225 (दारणा सोडून)
> जानेवारी 2013 पर्यंत पाण्याचा वापर 1375