आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी नियोजनासाठी सरसावले महापौर; आमदार गिते यांचे विरोधकांवर टीकास्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाणीप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी महापौर आयुक्तांसह खातेप्रमुखांची आढावा बैठक घेऊन पाणी नियोजन करणार आहेत, तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधकांवर सडकून टीका करीत पाण्यावरून राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

मागील वर्षाप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याबाबत एकत्र येऊन नियोजन करण्यापेक्षा सध्या र्शेयवादाचीच लढाई सुरू झाली आहे. यामुळे विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये जोरदार वाक्युद्ध रंगले आहे. महापौरांचा दौरा असो की, पिण्याच्या पाण्याचे नियोजन असो विरोधकांकडून यासंदर्भात टीका होत असल्याने सत्ताधार्‍यांनीही विरोधकांचा सामना करण्यासाठी सोमवारी आता पाणीपुरवठा विभागासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांकडून आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली आहे. आयुक्तांनीही अधिकार्‍यांकडून अहवाल मागविलेला असल्याने सोमवारी यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या प्रभागातील पाणी कपात आठवड्यातून एकदा केली. त्यानंतर त्यांच्याच सभापतींनीदेखील विशेष सभा घेत एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला. यामुळे शिवसेनेकडून राजकारण सुरू झाल्याने त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी मनसेने प्रथम सावध पवित्रा घेतला; मात्र विरोधकांचे हल्ले सुरूच राहिल्याने महापौरांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार वसंत गिते यांनी आता विरोधकांशी दोन हात करण्यासाठी दंड थोपटले आहेत.

याच अनुषंगाने शुक्रवारी सिडकोमधील प्रभाग 45च्या दौर्‍यावर सोमवारी पाणी नियोजनाविषयी बैठक घेणार असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे आमदार गिते यांनी विरोधकांवर निशाणा साधत पाण्याचे र्शेय विरोधकांना लाटायचे असेल तर त्यांनी खुशाल लाटावे, मात्र जनतेची दिशाभूल न करता नियोजनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

उचलली जीभ लावली टाळूला
विरोधकांकडून पाण्याविषयी सुरू असलेला सर्व प्रकार हा हव्यासासाठीच असल्याचा आरोप करीत त्यांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही असे आमदार गिते यांनी ‘दिव्य मराठी’बरोबर बोलताना सांगितले. परस्पर निर्णय घेऊन पाणी नियोजनाची अपेक्षा कशी केली जाते? नियोजन करण्यापूर्वी गळती थांबविणे, तोट्यांना कॉक बसविणे, जनप्रबोधन करणे या उपाययोजना न करताच निर्णय कसा घेणार? उच्च्भ्रू वस्तीमध्ये पाणी साठवण क्षमता आहे. मात्र, ज्या ती नाही तेथील नियोजन करायला नको का, असे विविध प्रश्न गिते यांनी उपस्थित केले. नाशिकसह सर्वच ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावठाण भागातही पाण्याची टंचाई आहे. यामुळे अशा भागाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. उपमहापौरांच्या प्रभागातील बजरंगवाडी भागात भेट दिली असता तिथे जलपरी बंद आढळल्याचे सांगून त्याठिकाणी पाणी टॅँकर सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. लोक समजदार आहेत; मात्र लोकप्रतिनिधींकडून त्यांची दिशाभूल केली जाते. ही वेळ राजकारण करण्याची नसून, एकत्र येऊन नियोजन करण्याची असल्याचा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.