आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठय़ाचे फेरनियोजन नाही; मंगळवारीच राहणार बंद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कमी दाबामुळे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठय़ाबाबत नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे. यामुळे पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदलाची चर्चा होती. परंतु शहरातील पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात तूर्तास तरी कुठलाच बदल करण्याविषयी कुठलाच निर्णय न झाल्याने शहराचा पाणीपुरवठा मंगळवारीच बंद राहण्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या महिन्यात महापौर अँड. यतिन वाघ यांनी आठवड्यातील दर मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गंगापूर धरणातील पाण्याचा साठा आणि त्यातून महापालिकेच्या वाट्याला आलेल्या आरक्षणातून 15 जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी सध्या स्थिती असली तरी पाऊस लांबल्यास नागरिकांना तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र मंगळवारी पुरवठा बंद ठेवल्याने त्यानंतरच्या दोन ते तीन दिवस सिडको, सातपूर आणि जुने नाशिकमधील बहुतांश भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे करत एकच वेळ; परंतु सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात शहर विकास आघाडीचे गटनेता गुरुमितसिंग बग्गा यांच्यासह काही नगरसेवकांनीदेखील दोनऐवजी दररोज एकच वेळ पाणी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार फेरनियोजनाविषयी महापौर वाघ यांनी होकार दर्शविला होता. मात्र, आहे त्या नियोजनात पुन्हा फेरबदल केल्यास शहरातील पाणीपुरवठय़ात आणखी विस्कळीतपणा येऊ शकतो, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाच्या वितरण आणि यांत्रिकी विभागाने व्यक्त केल्याने तूर्तास तरी हा निर्णय थांबविण्यात आला आहे. यामुळे आता गेल्या तीन आठवड्यांप्रमाणेच यावेळीदेखील मंगळवारीच पाणीपुरवठा बंद राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आता नियमित पुरवठा
गेल्या गुरुवारी मुख्य पंपिंग स्टेशनवरील मीटरमधील काही भागात बिघाड निर्माण झाल्याने शुक्रवारी अनेक भागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर शनिवारी व रविवारी नियमित पुरवठा झाला आहे. पाणी नियोजनात कोणत्याही फेरबदलाविषयी सूचना आलेल्या नाहीत. यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यादिवशी सिडको, सातपूर, पंचवटी या भागातील क्रॉस कनेक्शन्स, पाणी गळतीची दुरुस्ती केली जाणार आहे. -बी. जी. माळी, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका