आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात सुटेल प्रभाग 1 चा पाणीप्रश्न; नगरसेवकांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुतांश शहराला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात असताना, प्रभाग क्रमांक 1 मध्ये मात्र एका वेळचा आणि अपुर्‍या दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचे विशेषत: महिलावर्गाचे मोठे हाल होतात. ही समस्या ‘दिव्य मराठी विकास मंच’च्या व्यासपीठावर मांडून परिसरातील रहिवाशांनी प्रभागातील नगरसेवक गणेश चव्हाण व मीना माळोदे यांच्यापुढे समस्या सोडविण्याबाबत गार्‍हाणे मांडले. कलानगर परिसराच्या जवळ होणार्‍या 20 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे या भागातील पाण्याची समस्या सुटेल. हे काम वर्षभरात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही या वेळी नगरसेवकांनी दिली.
दिंडोरीरोड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात ‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘विकास मंच’ कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. व्यासपीठावर पंचवटी प्रभाग समिती सभापती लता टिळे, विभागीय अधिकारी अनिल वाघ, उपअभियंता सी. बी. आहेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, कनिष्ठ अभियंता रवि पाटील आदी उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी नगरसेवक गणेश चव्हाण व मीना माळोदे यांनी नागरी प्रश्नांची उत्तरे दिली. नगरसेवक गणेश चव्हाण यांनी सांगितले की, पाच कोटी 66 लाख रुपये खर्च असलेला जलकुंभ व जलवाहिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, येत्या आठ दिवसांत निविदा प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दीड महिन्यात जलकुंभाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या जलकुंभामुळे म्हसरूळ, कलानगर, पोकार कॉलनी या भागातील पाणीपुरवठय़ाची समस्या सुटणार आहे.

पाणीपुरवठय़ाची ही कामे होणार तातडीने
> शिवगंगानगर येथे पाणीपुरवठा करणे
> राजवाडा येथे जलवाहिनी टाकणे
> आरटीओ कॉर्नर जलवाहिनी स्थलांतरित करणे
> मोराडे वस्ती-जलवाहिनी टाकणे
> एस्सार पेट्रोलपंपाजवळ जलकुंभ साकारणार
> लक्ष्मी रो-हाऊससमोर जलवाहिनी टाकणे
> आकाश पेट्रोलपंप, राजवाडा, मोराडे वस्तीतील पाणीपुरवठा सुरळीत करणे
> शिवगंगानगर येथे 2 इंची जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करणे