आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बचतीचा संकल्प: आजपासून नाशकात पाणीकपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सध्याचे उपलब्ध आरक्षण आणि त्यानुसार जुलैपर्यंत कराव्या लागणार्‍या नियोजनाच्या दृष्टीने शहरात शनिवार (दि. 16)पासून 10 टक्के पाणीकपात करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच, मंगळवारी संपूर्ण शहरात दोन्ही वेळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे महापौरांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

शहराच्या पाणीपुरवठय़ाविषयी नियोजन करण्यासाठी गत सोमवारी महापौर दालनात आयुक्तांसह खातेप्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली होती. त्या चर्चेनंतरच महापौरांनी पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला असून, शनिवारपासून 10 टक्के पाणीकपातीच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या प्रभागापासून दर सोमवारी पाणीकपात सुरू केली होती. पाठोपाठ सिडको प्रभाग समितीनेदेखील पाणीकपातीचा निर्णय घेतल्याने सत्ताधार्‍यांसमोरही पेच निर्माण होऊन तातडीने नियोजन करण्याबद्दल काहीसा दबाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून लागू झालेली 10 टक्के पाणीकपात ही महानगराच्या भविष्यातील पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता काहीशी कमी करणारी ठरणार आहे.

मंगळवारी ‘कोरडा दिवस’
महानगरात दर मंगळवारी दोन्ही वेळेला पाणीपुरवठाच केला जाणार नाही. त्यामुळे मंगळवार हा एकप्रकारे महापालिकेतर्फे ‘कोरडा दिवस’ पाळला जाणार आहे. मात्र, मंगळवारच्या दिवशी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने पाइपमध्ये हवेचा दाब निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारच्या पाणीपुरवठय़ावरदेखील परिणाम होऊन तो कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

फेरबदल होऊ शकतात
शहरातील पाण्याची परिस्थिती बिकट होण्यापूर्वी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा अंतिम निर्णय नसून, त्याचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते फेरबदलदेखील आगामी काळात केले जाऊ शकतात. तसेच पाणीगळतीबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत. अँड. यतिन वाघ, महापौर

विभागनिहाय बंद ठेवण्याची गरज
मंगळवारचा एक दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यापेक्षा विभागनिहाय एकेका दिवशी सर्व विभागांचा पाणीपुरवठा बंद करणे अधिक सयुक्तिक ठरले असते. एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पाण्याच्या पाइपमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन सीमेंटच्या मुख्य जलवाहिन्या फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता

मंगळवारचीच निवड का?
आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असून, त्या दिवसांना घरांमधील अतिरिक्त कामे काढली जातात. तर त्यानंतर सोमवार हा आठवड्यातील पहिलाच कामकाजाचा दिवस असतो. त्यानंतरचा बुधवार हा नाशिकमध्ये आठवडेबाजाराचा वार असल्याने शहरवासीयांच्या सोयीसाठी मंगळवारीच पूर्ण दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर अँड. यतिन वाघ यांनी सांगितले.