आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी: ऐन गणेशोत्सवात नाशिककरांच्या दारी पाण्याचे विघ्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विघ्नहर्ता गणेशाच्या उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून प्रशासनातर्फे युद्धपातळीवर पूर्वतयारीचे संकेत असले, तरीही प्रत्यक्षात मात्र महापालिकेचे कारभारी गणेशभक्तांच्या आनंदावर ‘पाणी फिरविण्याचीच’ योजना आखत आहेत.

पाणीपुरवठा, वीज व स्वच्छतेशी संबंधित कामे उत्सवापूर्वीच होणे अपेक्षित असताना अधिकार्‍यांनी दुरुस्तीच्या नावाने पंचवटीत मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याही उपर पंचवटीतील बहुसंख्य भागांत एकवेळचा पाणीपुरवठा करून प्रशासनाने आपले कर्मद्रारिद्रय़ ठळकपणे विशद केले आहे.

उत्सवकाळात लोकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता नागरिकांची काळजी घेण्यात प्रशासनाला कुठलेही स्वारस्य नसल्याचे अधोरेखित होते.

प्रशासानाने गणेशोत्सवातील पाणीपुरवठा संदर्भातील अशा निष्काळजीपणातून ही बाब स्पष्ट केली आहे. पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्रात नवीन पंपिंग यंत्रणा जोडणीचे काम मंगळवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पंचवटीत मंगळवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, या भागात बुधवारी सकाळचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होणार आहे. वास्तविक, हे काम गणेशोत्सवापूर्वी किंवा नंतर करणे शक्य होते. परंतु, प्रशासनाने ऐन उत्सवात हे काम हाती घेत गणेशभक्तांचा ‘तळतळाट’ घेतला आहे.

एकवेळ पाणीपुरवठय़ाने पंचवटीकरांचे हाल
वरुणराजाच्या कृपेने गंगापूर धरण शिगोशिग भरले असतानाही पाणीकपातीचा वरवंटा नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी विशेषत: पंचवटी, आडगाव, आरटीओ कार्यालय परिसर व म्हसरूळ भागात एकवेळ पाणीपुरवठय़ाचा कद्रुपणा प्रशासनाकडून होतो आहे. दिवाळीच्या काळात शहरात एकवेळचा पाणीपुरवठा करण्याचे धोरण महापौरांनी प्रथमत: अवलंबिल्याने विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन महापौरांचा प्रयत्न हाणून पाडला होता. आता पाणीकपातीची उरफटी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा सत्ताधार्‍यांच्या विरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नगरसेवकांच्या संमतीने निर्णय
पाणीपुरवठा करण्यास काही दिवसांपासून अडचणी येत असल्यामुळे पंचवटीत पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पूर्वतयारीसाठी काही कालावधी लागत असल्याने ते गणेशोत्सव काळात करण्यात येणार आहे. एकवेळच्या पाणीपुरवठय़ाचा निर्णयही संबंधित नगरसेवकांच्या संमतीने घेण्यात आला. काही भागांत दोन वेळा पाणीपुरवठा केल्यानंतर अनेक अडचणी उद्भवत होत्या. अशाच भागांत एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.
-राजेंद्र शिंदे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

असा दुजाभाव का?
आम्ही नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना एकवेळचा पाणीपुरवठा का केला जातो? इतरत्र दोन वेळचा पाणीपुरवठा होतो. मग आमच्यावरच पाणी कपातीचा निर्णय का लादला जातोय, असा दुजाभाव का केला जातोय?
-प्रवीण भागवत, मेरी

पहाटे 3 वाजेनंतर येते पाणी
पहाटे 3 वाजेनंतर पाणी येत असल्याने आम्हाला रात्रभर पाण्यासाठी जागावे लागते. दिवसभराची कामे व पाण्याची प्रतीक्षा करत होणार्‍या जागरणामुळे आमच्या आरोग्यावरही परिणाम होतो आहे. महापालिकेने वेळेत व मुबलक पाणीपुरवठा करावा.
-अंजना अशोक वाघमारे, शिवतेजनगर, पेठरोड

गणेशोत्सवातच ओढावली बला
सकाळच्या वेळी अर्धा तासच पाणी येत असल्यामुळे पाण्यासाठी खूपच हाल होतात. ऐन गणेशोत्सवाच्या आसपासच ही बला ओढावल्याने त्रास होत आहे. -संगीता सुनील डुक्की, फुलेनगर

आमच्या भावनांशी खेळू नका
गणेशोत्सवाचे वेध आम्हा सर्वांनाच लागले आहेत. महापालिकेने उत्सवापूर्वीची कामे पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, उत्सवकाळात पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. किमान उत्सवकाळात तरी दोन वेळचा पाणीपुरवठा व्हावा.
- डॉ. आर. एल. घुमरे, आडगाव