आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी कपातीबाबत पाटबंधारे खाते करणार पालिकेस अॅलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पावसाने दिलेली ओढ गंगापूर धरण समूहातील ६० टक्क्यांपर्यंत असलेला पाणीसाठा लक्षात घेता, आता पाटबंधारे खात्याने महापालिकेला पत्राद्वारे अॅलर्ट करून पाणीकपातीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी पत्र पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने सप्टेंबर अखेरीस पाणीकपातीबाबत योग्य तो निर्णय घेण्याची तयारी केली असून, अशातच पाटबंधारे खात्याचे पत्र प्राप्त झाल्यास सिंहस्थाच्या तिसऱ्या पर्वणीनंतर अंमलबजावणी होऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

गंगापूर धरण समूहात जवळपास ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, या समूहातील प्रमुख धरण असलेल्यागंगापूर धरणावर सर्व भिस्त अवलंबून आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याची प्रमुख जबाबदारी याच धरणावर आहे. दरवर्षी पालिका पाटबंधारे विभाग यांच्यात पाणी आरक्षणावरून घासाघीस होते. १५ ऑक्टोबर ते १५ जुलै या कालावधीकरिता पालिका पाणी आरक्षित करते. त्यानंतर ९० दिवसांचा कालावधी पावसाचा असल्याने त्या काळात पाणी आरक्षणाची गरज नसते. प्रतिदिवस ४०० दशलक्ष लिटर याप्रमाणे पालिका पाणी घेत असते.

दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे तसेच धरणातील पाणी आरक्षणाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे आहे त्या पाण्याचे नियोजनबद्ध वितरण काटकसरीची जबाबदारी पाटबंधारे खात्यावर आली आहे. मात्र, पाणीकपात किती लागू करायची, याबाबतचे अधिकार ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच शहरी भागात महापालिकेकडे असल्यामुळे संबंधित यंत्रणेला सजग करण्यासाठी पाटबंधारे खात्याने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाटबंधारे खाते महापालिकेला पत्र देऊन आपल्या क्षेत्रात तातडीने परिस्थिती लक्षात घेत पाणीकपात लागू करावी, असे कळवणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पाणीकपात किती करायची, याचा निर्णय संबंधित महापालिकेवरच सोपवला आहे.

पहिल्या टप्प्यात १० टक्के पाणी कपात
मागीलअनुभव लक्षात घेत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे गंगापूर धरण समूहातील पाणीपातळी वाढली होती. अद्याप सप्टेंबर महिन्याचे २० दिवस बाकी असून, पाऊस येईल अशी अाशा कायम आहे. अशा परिस्थितीत पहिल्या टप्प्यात १० टक्के पाणीकपात लागू होऊ शकते, असे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थात त्याबाबतचा निर्णय तिसऱ्या शाहीस्नान पर्वणीनंतर होईल असेही सांगण्यात आले.