आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचसाठी का केला होता अट्टहास?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको (नाशिक)- पाणी म्हणजे जीवन आणि पाणी देणं हेही मोठं पुण्याचं काम. हे पवित्र काम करायला मिळणं भाग्याचंच. पण, ते करताना ‘याचसाठी का केला अट्टहास?’ असा प्रश्न पडतो. म्हाडा कॉलनीतील छत्रपतीनगरात 2005 पासून मोठा खर्च करून माझी निर्मिती करण्यात आली. 2006- 07 साली काम पूर्ण झालं आणि 2008 नंतर आसपासच्या भागात मी पाणी पुरवू लागलो. पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर गेट, इंदिरानगर, चेतनानगर या परिसरातील साडेतीन लाख लोकसंख्येचा पाणीप्रश्न मिटला.

अनेक राजकीय नेत्यांनी अगदी प्रामाणिकपणे माझी निर्मिती होण्यासाठी प्रयत्न केले. तर काहींनी माझ्याआडून केवळ राजकारण केले. पण, तुमच्यासाठी माझी निर्मिती होणारच होती. या सार्‍यातून मी उभा राहिलो. आज 40 लाख लिटर पाणी स्वत:च्या पोटात साठवून तुमची गरज भागवतो आहे. मला जोडीला म्हणून आणखी दोन जलकुंभ उभे राहणार आहेत. आजची माझी स्थिती खूपच भयानक झाली आहे. माझ्या निर्मितीत काही स्वार्थी नेते-ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला. माझ्या पोटातून तुम्हाला पाणी पुरवणार्‍या जलवाहिनीची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाते आहे.

मुख्य जलवाहिनी तर अतिशय धोकादायक बनली आहे. कधीही काहीही होऊ शकते. ती फुटली तर आजुबाजूच्या नागरिकांचा जीव धोक्यात येईल. माझ्या पोटालाच तडा गेला तर केवढा मोठा अनर्थ घडेल, कल्पना तरी आहे का? हे भीषण संकट उद्भवू नये म्हणूनच तुमच्याशी संवाद साधण्याचा हा प्रपंच. सत्ताधार्‍यांनो-अधिकार्‍यांनो, सावधान. माझी काळजी घ्या. नाही तर काय होईल याचा विचार तुम्हीच करा..

जलकुंभाची क्षमता 40 लक्ष लिटर
> दिवसाला 10 हजार लिटर पाण्याचा अपव्यय (मनपाच्या दराने किंमत 50, बाजारभावाने एक लाख रूपये)
>वर्षाला 36,50,000 लिटर पाणी वाया (मनपाच्या दराने किंमत 18250, तर बाजारभावान 3 कोटी 65 लाख रुपये)
>आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 82 लाख 50 हजार लिटर पाणी वाया (मनपाच्या दराने किंमत 91250, बाजारभावाने किंमत 18 कोटी 25 लाख रुपये) या या पाण्याने दरडोई दिडशे लिटरप्रमाणे सुमारे 1 लाख 23 हजार लोकांची एक दिवसाची पाण्याची गरज भागली असती.