आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव पाणी दिल्यानंतरही ३०० दशलक्ष घनफूट तूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर नाशिककरांच्या संयमाची परीक्षा बघण्याचा प्रकार सुरूच असून, गेल्या अाठवड्यात पालकमंत्र्यांनी पाणीकपात टाळण्यासाठी ३०० दशलक्ष घनफूट पाणी दिल्यानंतरही ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असेल तर अजून ३०० दशलक्ष घनफूट पाणी लागेल, असे महापालिकेने ठणकावून सांगितले. त्यानंतर भाजप अामदारांच्या वतीने शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी वाढीव पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगत कपातीबाबत मंगळवारी पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. दरम्यान, महापाैर अशाेक मुर्तडक यांनी पाण्याबाबत याेग्य निर्णय झाल्यास स्वायत्त संस्था असलेल्या महापालिकेची महासभा सक्षम निर्णय घेईल, असे सांगत एक दिवसाची पाणीकपात केली जाईल, असे अधाेरेखित केले.
महापाैरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रथम अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी ३१ जुलैचा विचार करीत शिल्लक १७१ दिवसांसाठी राेज ३५० दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणी द्यायचे ठरले तर २५ दिवसांची तूट येईल, असे स्पष्ट केले. ही तूट भरून काढण्यासाठी एक तर पाणीकपात वाढवावी लागेल किंवा ३०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल, असे सांगितले. त्यावर अामदार सानप यांनी २०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून देण्यासाठी पुन्हा पालकमंत्र्यांची भेट घेतली जाईल. सध्या ते मांगीतुंगी येथील उत्सवात व्यस्त असल्यामुळे मंगळवारी पुन्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यावर महापाैरांनी निर्णय झाल्यास महासभा पाणीकपातीबाबत विचार करेल, असे स्पष्ट केले.
गळतीवरूनअायुक्तांचा भाजपला दणका : पक्षीयराजकारणात नाशिककरांची पर्यायानेच महापालिका प्रशासनाची फरफट हाेणार नाही, याची दक्षता घेत अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी राेखठाेक भूमिका घेतली. भाजप अामदार गटनेत्यांनी मराठवाड्याचा मुद्दा झाकण्यासाठी पालिकेच्या पाणीगळतीकडे बाेट दाखवणे सुरू केले. त्यावर अायुक्तांनी अचानक सर्व गळती थांबवण्याचे ठरवले तर यंत्रणेअभावी कसे शक्य हाेईल, याकडे लक्ष वेधले. चार लाख मिळकती, १५०० किमीच्या जलवाहिन्या तपासण्यासाठी जेमतेम १५ अभियंता या जाेरावर सर्व शक्य कसे हाेईल, हेही सक्षमपणे सांगितले. त्याबराेबरच एकलहऱ्याचे ३०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून द्यावे असे पत्र दिले असून, याचा अर्थ तेवढ्या पाण्यात ३१ जुलैपर्यंतचा प्रश्न सुटेल असा काेणी ग्रह करू नये, असेही स्पष्ट केले.

महापाैरांच्या चतुराईने घोंगडे भाजपकडे
पाणीकपातीशिवाय पर्यायच नसल्याची बाब ध्यानात घेऊन पालकमंत्र्यांबराेबर चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगत भाजप अामदारांनी बैठक गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू केला हाेता. मात्र, महापाैरांनी चतुराईने एकतर वाढीव ३०० दशलक्ष घनफूट पाणी द्या, अन्यथा अाठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय मान्य करा, असे सांगत भाजपवर घोंगडे टाकले. परिणामी, अाता भाजपला ३५० दशलक्ष लिटर राेज याप्रमाणे पाणी पुरवून दाखवण्याची माेठी कसरत करावी लागणार अाहे.

छुपी कपात चालणार नाही
उपमहापाैरगुरुमित बग्गा शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी ३५० दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा सुरूच ठेवावा लागेल, असे सांगत काेणतीही छुपी कपात खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. छुपी कपात झाल्यास तळाकडील भागात पाणीपुरवठा पाेहोचत नसून, ते फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण शहरात कसा हाहाकार झाला, याचे ताजे उदाहरण असल्याकडे लक्ष वेधले.

मनसेकडून बैठकीला सुरुंग
पाण्याच्यामुद्यावरून भाजप अडचणीत असताना चक्क त्यांना अायतेच काेलीत देण्याची संधी मनसेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी दिली. जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पाणी नियाेजनाचा विषय असताना पुन्हा जायकवाडीला पाणी साेडण्याचा मुद्दा उकरून राजकीय रंग दिल्यावर भाजप अामदारांनी बैठकीतून बाहेर जाण्याचा पवित्रा घेतला. कशीबशी महापाैरांनी समजूत काढून अामदारांना बसवल्यानंतर पुन्हा गटनेता अनिल मटाले यांनी फटाका फाेडत पालकमंत्र्यांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे, पाण्याचा विषय असताना चक्क सिंहस्थ निधी अडवणूक, टीडीअार धाेरणाचा विषय काढल्यावर बैठकीचा नूरच पालटला. विशेष म्हणजे, गटनेत्यांचीच बैठक असताना अनेक नगरसेवकांनी या बैठकीत भाषणबाजी सुरू केल्यामुळे निर्णायक स्वरूपाच्या बैठकीचे अक्षरश: चावडीत रूपांतर झाल्याचे दिसत होते आणि त्यातून स्वत:च पदाधिकाऱ्यांवर बैठक अयशस्वी ठरली, अशी कबुली देण्याची वेळ अाली.

पाणीकपातीच्या प्रश्नावर सर्वपक्षीयांच्या बैठकीत अशी खडाजंगी हाेऊनही बैठक अनिर्णीत राहिली.