आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी गळती - नियोजनानेच होईल अपव्ययावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लांबलेल्या पावसाने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळविले असताना, प्रत्येक जबाबदार नागरिकाने पाणीबचत करणे गरजेचे आहे. त्याकरिता अनेक जण पुढे येत असले, तरी प्रशासनाची भूमिका यात महत्त्वाची आहे. महापौर, जिल्हाधिकारी स्वत: पाणीबचतीचे आवाहन करीत असतानाही गळतीबरोबरच काही बेजबाबदार नागरिकांकडून पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केल्यावरच हा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.
शासकीय निर्देशानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिन 150 लिटर पाण्याची गरज असते. आज शहराची दैनंदिन पाण्याची गरज 390 दशलक्ष लिटर आहे. त्यात महापालिकेच्याच सभागृहनेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 12 टक्क्यांच्या आसपास पाणीगळती आहे. ही गळती जरी थांबविली गेली तरी दैनंदिन 46 दशलक्ष लिटर पाणी वाचू शकणार आहे. सिडको व सातपूर परिसरात एकवेळ पाणीपुरवठा केला जातो, तर इतर भागात दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. पाण्याचे काटेकोर नियोजन करताना सर्वत्र एकवेळ पुरेसा पाणीपुरवठा करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
येथे होतोय अपव्यय
बोधलेनगरला जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हमधून पाणीगळती सुरू असल्याचे पाहायला मिळाले. सीबीएस परिसरात टॅँकरकरिता उभारलेल्या आउटलेटमधूनही पाण्याचा अपव्यय होताना दिसला. जिल्हा रुग्णालयात पाणपोईतून पाणी कायम वाहताना दिसून आले. सिडकोतील इंद्रनगरी, कामटवाडे, श्रीरामनगर, पवननगर या परिसरातही पाण्याची नासाडी दिसून आली.
गळती रोखण्याचे मोठे आव्हान
- शहराला होणा-या पाणीपुरवठ्यावेळी दररोज गळतीमुळे 100 दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. ही गळती थांबवण्याचे आव्हान महापालिकेसमोर वर्षानुवर्षे आहे. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. किती पाणी उचलले जाते व वितरित किती होते, तसेच वॉटर आॅडिटदेखील केले जात नाही. काही ठिकाणी एकवेळ, तर काही ठिकाणी दोन वेळा पाणीपुरवठा हा दुजाभाव आहे. वेळ आल्यानंतर ओरड करण्यात अर्थ नसून, त्यासाठी कायमस्वरूपी नियोजन होणे गरजेचे आहे.
सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता, शिवसेना
एकवेळ पाणी पुरेसे
- दोन वेळाऐवजी एकवेळ, पण पुरेसे पाणी देण्याची गरज आहे. याकरिता पावले उचलणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण त्यामुळे हलका होऊ शकेल, तसेच विजेची आणि पाण्याचीही बचत होईल. शालिनी पवार, सभापती, पंचवटी प्रभाग