आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भावली’ भरले, ‘मुकणे’त 30 टक्के साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरले आहे. दारणा व कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर असून, मुकणे धरणात मात्र अवघा 30 टक्केच पाण्याचा साठा झाला आहे.

1994 मध्ये शासनाने तालुक्यातील मुकणे येथे नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत 4426 दलघफू क्षमतेचे धरण बांधले. मात्र, तेव्हापासून दर पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्यात या धरणाची इतकी निच्चांकी पातळी कधीच राहिलेली नाही. यंदा पाऊस जरी उशिराने पडला, तरी सुरुवातीच्या दोन महिन्याची तूट पावसाने गत सप्ताहात भरून काढल्यानेच भावली धरण भरले तर दारणा,कडवा,वैतरणा आदी धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे मुकणे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 647 मि. मि. इतका पाऊस बरसूनही धरणात जेमतेम 30 टक्के पाणीसाठा आहे. या धरणाला उगम कमी असून, वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी बांध घातल्यामुळे वैतारणातच साठू लागले आहे. भावलीतील ओव्हरफ्लो व सांडव्याच्या प्रवाहाचे पाणी हे दारणा धरणात येते. मुकणे धरणात केवळ 30 टक्के साठा झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
देवनदीचे पाणीपूजन
कोनांबे धरण भरून देवनदी प्रवाहित झाली असून, देवनदीचे पाणी सोनांबे शिवारात पोहोचल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ डावरे, मधुकर शिंदे, गंगाराम पवार, विलास पवार, जनार्दन पवार, सुरेंद्र बैरागी, अशोक पवार आदींनी पाण्याचे पूजन केले. याप्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीफळ, फुले टाकून नदीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. टंचाई स्थितीमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
इगतपुरी शहरात दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शहराला पाणीपुरवठा करणारा शहरातील नगरपरिषदेचा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होत असून, सध्या आठवड्याने होत असलेला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.