आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी उचलण्याचे मीटरच सहा महिन्यांपासून बंद, महापालिकेचा पाण्याचा सारा मामला अंदाधुंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराला पिण्यासाठी आवश्यक असलेले पाणी गंगापूर धरणातून रोज उचलले जाते. त्याचा रोज हिशेबही ठेवणे आवश्यक आहे. परंतु, उचलण्यात येणारे पाणी मोजण्यासाठी पंपिंग स्टेशनवर असलेले मीटरच सहा महिन्यांपासून बंद असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघड झाले आहे. त्यामुळे रोज किती पाणी धरणातून उचलले जाते, याचा कुठलाही अचूक हिशेब नसून, मोघमपणे पाणी उचलले जात असल्याने महापालिकेचा पाण्याचा साराच मामला अंदाधुंद असल्याचेही यातून उघड झाले आहे.
दुष्काळी पार्श्वभूमी त्यात धरणात कमी पाणी असल्याने पुढील ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी मनपाने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे. वॉटर ऑडिट करण्याचेही सोपस्कर मनपाने पार पाडले आहेत. त्याच वेळी प्रत्येक नळजोडणीला मीटर लावण्याचाही पर्याय पुढे आल्यानंतर त्यावर काही अंशी सहमतीही झाली होती. एकीकडे नागरिकांच्या नळांना मीटर लावत नेमके किती पाणी ते वापरतात, याचा हिशेब लावण्याच्या तयारीत असलेल्या पालिका प्रशासनाच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणले आहे. गंगापूर धरणातून लिफ्टिंग करण्यात येत असलेल्या पाण्याचे मीटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे.
त्यामुळे मनपाच धरणातून किती पाणी उचलते, याचा हिशेब नाही. रोज आवश्यक असलेले १० दलघफू पाणीउचल कशी मोजली जाते याबाबतच शंका असून, त्यापेक्षाही जास्त पाणी उचलल्यानंतरही १० ते ११ दलघफू इतकेच पाणी उचलल्याचे कागदोपत्री आकडे रंगविले जात असल्याचीही शक्यता बळावली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशानंतरही मीटर बंदच: गंगापूरधरणावर गाळ उपसण्याच्या कामाची पाहणी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्याच वेळी त्यांनी मनपाच्या पंपिंग स्टेशनलाही भेट दिली होती. त्यावेळी मीटर बंद असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ते सुरू करण्याचे आदेश दिले होते. लागलीच हे मीटर सुरू करण्याबाबत मनपातर्फे अाश्वासितही करण्यात आले होते. पण, त्यानंतरही अद्याप मीटर बंदच असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडेच दुर्लक्ष करत मीटरशिवाय पाणी उपसा सुरूच आहे.

१५ मोटारींद्वारे उचलले जाते पाणी
गंगापूर धरणार आणि प्रकाराच्या दोन विंग आहेत. त्यात विंगमध्ये ४५० हॉर्सपॉवरच्या आणि ६०० हॉर्सपॉवरच्या मोटारी आहेत. विंगमध्ये ६०० हॉर्सपॉवरची एक, ४५० हॉर्सपॉवरच्या आणि १००० हॉर्सपॉवरच्या मोटारी आहेत. अशा १५ मोटारींद्वारे तासानिहाय अंदाजे पाणीउचल करत त्याची मोजणीही केली जाते.

कार्यक्षमतेवर लावला जातो अंदाज
पंपिंग स्टेशनवरील पाणी उचलण्याच्या मोटारींच्या क्षमतेनुसार अंदाजे तासानिहाय पाणी मोजले जाते. त्यात मोठ्या प्रमाणावर जादा पाणी उचलले जात असल्याने हे पाणी गळतीच्या स्वरूपात व्यर्थ जात असतानाही त्याचा हिशेबच लागत नाही.

जाणीवपूर्वक मीटर नादुरुस्तीचा संशय
मीटर सुरू केल्यास त्यावर पडणाऱ्या रीडिंगमुळे अगदी १० दलघफू इतकेच पाणी उचलावे लागेल. सध्याची पाणीगळती पाहता हे पाणी शहराला पुरणारच नाही. लागलीच मनपाचे बिंब फुटेल याचाच धास्ती असल्याने मनपाकडून हे मीटर दुरुस्त केले जात नसल्याचाही संशय आहे.
गंगापूर धरणावरील पंपिंग मशीन.
सात-आठ दिवसांत नवीन मीटर
^मीटर नादुरुस्त असून, त्याबाबत निविदा काढल्या आहेत. येत्या सात-आठ दिवसांत नवीन मीटर बसविले जाईल. पाटबंधारे विभाग महापालिकेकडून सध्या गेज पद्धतीनुसार पाण्याची मोजणी केली जात आहे. -यू. बी. पवार, अधीक्षक अभियंता