आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी नळांना मीटर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - शहरात पाण्याचा होत असलेला अपव्यय आणि पाणीपुरवठ्यातील विस्कळितपणा यावर नियंत्रण व्हावे, नागरिकांना पाणी वापरानुसार पाणीपट्टी आकारली जावी, यासाठी सर्व नळांना मीटर बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
विद्यावर्धिनी नगरात नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती मेहमूद दारूवाला, मुख्याधिकारी संजय दुसाने यांच्या हस्ते या योजनेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. या नगरात 50 नळांना जोडणी करण्यात येणार असून, त्यांना 24 तास पाणी दिले जाणार आहे.
ज्या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर आहे तेथे प्राधान्याने मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नळांना मीटर बसविल्यानंतर 24 तास पाणी देण्याचे प्रयोग राबवून ते यशस्वी झाल्यावर अन्य ठिकाणी लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाला यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीच्या टप्प्यात 1000 नळांना मीटर बसविले जाणार आहे. प्रभाग एकमधील विद्यावर्धिनी नगरात बुधवारी या कामास प्रारंभ झाला.
यावेळी नगरसेवक बापू गोजरे, मल्लू पाबळे, संजय नवसे, हर्षद देशमुख, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, मंगला जाधव, आश्विनी देशमुख, लता मुंढे, लता हिले, शीतल कानडी, सुजाता गाडे, उज्ज्वला खालकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वापरानुसार भरावी लागणार पाणीपट्टी - पाण्याचा शहरात मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. काही लोकांना भरपूर पाणी मिळते तर काहींना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. शिवाय पाणी पट्टी मात्र सर्वांनाच समान समान भरावी लागत असल्याने पाणी मिळत नसतांनाही अनेक नागरिकांना न घेतलेल्या पाण्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. मीटर बसवल्याने गरजेनुसार नागरिक पाणी घेतील. जेवढे पाणी वापरले जाईल त्याप्रमाणे मीटर नुसार पाणी पट्टी आकारली जाणार आहे. त्यामुळे सामान्य शहरवासियांच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह अशीच आहे.