आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मीटर बंद’मुळे दीडपट पाणीपट्टी, ‘पाटबंधारे’चा मनपाला दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब ठेवणारे मीटर बंद असल्याचा दणका अखेर पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिला आहे. आजच्या स्थितीत आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या दीडपट पाणीपट्टी जानेवारीपासूनच भरावी लागणार आहे. शिवाय, बंद असलेल्या दोन्ही मीटरला दुरुस्त करून त्यांच्या कॅलिब्रेशनचा अहवालही त्वरित सादर करण्याचे आदेशच पाटबंधारे विभागाने मनपाला दिल्याने आता महापालिकेच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
मीटर नादुरुस्त होऊ शकते. पण, दुष्काळी स्थितीत ते तत्काळ दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु ते झाले नसल्यास दंड आकारणी होणे अपरिहार्यच आहे. ती वाढीव दंडाची रक्कम नागरीकांकडूनच वसूल केली जाईल. त्यामुळे शहरवासीयांना कपातीनंतरही अार्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्यास ती कपातीचा उपयोग नाही. शिवाय मीटर जाणीपुर्वक बंदच ठेवले जात असून त्याद्वारे जादा पाणी उचलत ते शहरातील कुठल्यातरी बाबागासाठी वापरलेच जात असल्याच्या जलसंपदा विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने नाव छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’शी बोलतांना सांगितले.

त्यामुळे मनपाचाच हा सारा गफला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनपाने धरणात पाणी कमी असल्याचे कारण पुढे करत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू केली आहे. प्रत्यक्षात नाशिक शहरासाठी आरक्षित असलेल्या दारणा आणि गंगापूर धरणात मुबलक पाणी आहे. पण, आपल्या वितरणातील त्रुटी झाकण्यासाठीच ही पाणीकपात सुरू केली असून, पाणी लिफ्टिंगचा हिशेब ठेवणारे मीटरही बंद असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणले. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या नाशिक उजवा तट कालवा उपविभागाने मनपाच्या पाणीपुरवठा विभागास पत्रच काढत मीटर त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. शिवाय, जानेवारी २०१६ पासून पाणीपट्टीही १.५० टक्के पटीने भरण्याचे सांगत लवकरात लवकर ती जमा करण्याचेही पत्रात नमूद केले आहे.

पाटबंधारेचेही पूर्वी केवळ तोंडीच आदेश
पाटबंधारे विभागाच्या वतीने गंगापूर धरणावरील मनपाच्या पंपिंग स्टेशनला यापूर्वी दिलेल्या भेटीत मीटर बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याचे तोंडीच कळविण्यात आले होते. पण, त्यात कुठलीही सुधारणा मनपाने केली नाही. त्यावर पाटबंधारे विभागाने कुठलीही कारवार्ईदेखील केली नाही. दरम्यान, सहाय्यक अभियंता बटे आणि शाखा अभियंता खैरनार यांनी १३ एप्रिल रोजी पुुन्हा पंपिंग स्टेशनला भेट दिली. त्यात हे मीटर बंदच असल्याचे आढळून आले. पण, त्यावरही कुठलीही कार्यवाही करण्याची तसदी पाटबंधारे विभागाने घेतली नाही. ‘दिव्य मराठी’ने ही बाब निदर्शनास आणल्यानंतर मात्र लागलीच १८ एप्रिलला त्यांना पत्रच काढत पाणीपट्टीला दीडपट वाढीव दंडाची आकारणी केली आहे.
मनपा पंपिंग स्टेशनवरून पाणी उचलण्यासाठी असलेल्या प्रणालीत ‘अ’ आणि ‘ब’ प्रकारची सीरिज मशिनरी बसवि‌ण्यात आली आहे. या दोन्ही टाइपच्या पंपांचे मीटर बंद असल्याचे आढळले. गेज पुस्तक स्थानिक कर्मचाऱ्याकडे त्याची विचारणा केली असता, त्याने जानेवारी २०१६ पासून ते बंद असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात यापूर्वीही येथील मीटर बंद असल्याचे आढळल्याचे पाटबंधारे विभागाने पत्रात नमूद करत ते दुरुस्तीबाबत तोेंडी आदेश दिल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे तीन महिने जरी अधिकृतरीत्या मीटर बंद असल्याचे मनपा सांगत असली तरीही ते मीटर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असल्याचे स्पष्ट होत आहे.