आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मुकणे'प्रश्नी शाब्दिक युद्ध, आ. देवयानी फरांदे यांचा चौफेर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुकणे जलवाहिनीच्या वादग्रस्त ४६ कोटी रुपयांच्या वाढीव मंजुरीवरून शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे जबरदस्त पॉलिटिकल वॉर शनिवारी महासभेत बघायला मिळाले. विशेष म्हणजे, भाजपच्या प्रतिनिधी आमदार देवयानी फरांदे यांनी चौफेर हल्ला चढवल्यानंतर या शब्दांच्या चटक्यांची झळ इतकी बसली की, राहवून उपमहापौर, महापौरांसह प्रतिनिधी आयुक्तांनाही शाब्दिक बाण चालवण्याची वेळ आली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या चर्चेत नाशिककरांच्या पाणीप्रश्नाचा संवेदनशील मुद्दा उपस्थित करून वाढीव रकमेस मंजुरीला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मुकणे जलवाहिनीच्या अंदाजपत्रकातील कथित गैरव्यवहारावरून चांगलाच वाद पेटला. चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे, काँग्रेस, काही प्रमाणात शिवसेनेच्या नगरसेवकांनी जलवाहिनीच्या वाढीव रकमेला हिरवा कंदील दाखवला. मात्र, प्रमुख नेत्यांनी मैदानात उडी घेतल्यानंतर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. रिंपाइंचे गटनेते प्रकाश लोंढे यांनी काही दिवसांपूर्वी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय शहरात जणू पाणीबाणीचे संकट उभे करण्यासाठी केली त्याचा फायदा घेऊन मुकणे जलवाहिनीची वाढीव रक्कम मंजूर केली जात असल्याचा आरोप केला. शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी ही योजना युतीने मंजूर

केलेल्या योजनेचा कसा बट्ट्याबोळ वाजला, याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दोन-दोन अंदाजपत्रकांना मंजुरी दिल्यामुळे मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला. शासनाने या योजनेला स्थगिती दिली ती मुळात पारदर्शकता नसल्यामुळेच, असाही दावा केला. आज ही योजना मंजूर करण्यासाठी पाणी संकट निर्माण केले गेले जणूकाही आम्हीच आधुनिक भागीरथ या थाटात योजनेचे श्रेय लाटत असल्याचा टोला लगावला.
सुधाकर बडगुजर यांनी २२० कोटी रुपयांची योजना २७० कोटींपर्यंत जाण्याचे कारणच नसल्याचा दावा केला. मुळात यात जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता २०७ वरून १३७ एमएलडीपर्यंत आली. कॉपर डॅमचे काम कमी झाले. अशा परिस्थितीत किंमत कमी होण्यापेक्षा वाढली कशी, असा प्रश्न करीत निविदा अटी-शर्तीतील नियमांचे कसे उल्लंघन झाले, यावर प्रकाश टाकला. कामात अनियमितता होती म्हणूनच तांत्रिक बदलासह वाढीव रकमेला मान्यता घेण्याचा प्रस्ताव महासभेवर आला, असा गंभीर आरोपही केला. वाढीव रक्कम शासनाकडून घ्यावी त्याचा बोजा महापालिकेवर टाकू नये, अशीही मागणी केली. देवयानी फरांदे यांनी तांत्रिक सुधारणा निविदेपूर्वी का केल्या नाहीत, पाच ठेकेदार माघारी गेल्यावर दुरुस्ती कशी झाली, याची उत्तरे मागितली. मुकणे योजनेला कोणाचाही विरोध नसून, या योजनेतील अनियमिततेला विरोध असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुकणे योजनेत कोणतीही अनियमितता झाली नाही विलंबामुळे अंदाजपत्रक वाढल्याचे सांगत अनेक मुद्दे खोडले.
आमदार फरांदे यांनी नगरसेवक निधी प्रलंबित कामांवरून आयुक्तांनाच लक्ष्य केले. फेसबुक, व्हॉट‌्सअॅपवर राहणाऱ्या आयुक्तांनी नगरसेवकांना निधी देऊन स्मार्ट करावे, असा चिमटा त्यांनी काढला. त्यावर आयुक्तांनी प्रश्न विचारणारा व्यक्ती उपस्थित नसला तर संवादासाठी जी माध्यमे उपलब्ध असतात त्यांचा वापर करावा लागतो, असे रोखठोक प्रतिउत्तर दिल्यावर हशा पिकला.
उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी मुकणे योजनेला पॉलिटिकल स्टे होता, असा आरोप करीत ‘घार उडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी’, असे सांगत आकाशाकडे जास्त बघितले तर बरे असा फरांदे यांना अप्रत्यक्षपणे चिमटा घेतला. महापौर अशोक मुर्तडक यांनी या चर्चेची सांगता करताना, अनेकांनी अमृतवाणीतून चटके दिल्याचे सांगत समुद्रापाशी उभे राहिले आणि सुनामीने ओढून नेले, असे उदाहरण देत भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.