आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलमाफियांना अन्न व औषध प्रशासनाकडून अभय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मिनरल वॉटरच्या सीलबंद बाटल्यांत अक्षरश: घाण निघाल्याचा व या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन संबंधितांना कसे पाठीशी घालते, याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवारी प्रसिद्ध केले.
प्रशासनाचे सहायक आयुक्त चंद्रकांत पवार यांनी सोमवारी या कंपनीवर कठोर कारवाईचे दिलेले आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे प्रशासनाचे हात यात बरबटलेले नाही ना? इथपर्यंत संशय निर्माण होत असून, जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या जलमाफियांवर कारवाई ऐवजी हातावर हात ठेवून प्रशासन कसली वाट पाहतेय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

शुद्ध पाण्याच्या नावाने काही कंपन्यांकडून गोरखधंदा सुरू असून, कुठलीही प्रक्रिया न करता थेट बाटल्या पॅकिंग करून त्या विक्री होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, बीआयएस नियमांचे सर्रास उल्लंघन करीत बाटल्यांवर लावण्यात येणाऱ्या लेबल्सवरही खोटी माहिती दिली जात आहे.
घरगुती कार्यक्रमासाठी येणाऱ्या आप्तांना शुद्ध पाणी मिळावे, म्हणून इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख परिसरातील एका कंपनीतून हजारावर पॅकिंग बाटल्या घेणाऱ्या सातपूर येथील एका ग्राहकाला या सर्व बाटल्यांतील पाण्यात अक्षरश: कचरा आढळल्याने त्याने अन्न व औषध प्रशासनाकडेही दाद मागितली. मात्र, प्रशासनाने इतक्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. यानंतर ‘दिव्य मराठी’कडे या ग्राहकाने तक्रार केल्यानंतर सहायक आयुक्त चंद्रकांत पवार यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता, सोमवारी या ग्राहकाला पाठवा, कंपनीवर कडक कारवाई करतो’ असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, या ग्राहकाने सोमवारी अन्न-औषध प्रशासनाचे कार्यालय गाठले, मात्र त्याला पवार यांना भेटू दिले गेले नाही. लेखी तक्रार आणि काही पाण्याच्या बाटल्या मात्र ठेवून घेतल्या गेल्या.

...अन‌् ग्राहकालाच सुरू झाले क़ॉल
या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, उलट या ग्राहकाला सायंकाळी ही कंपनी चालविण्यास इच्छुक असलेल्या एका तरुणाचे कॉल सुरू झाले. आपण भेटू, त्या बाटल्या मला परत द्या, तुमचा पत्ता द्या, मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो, मला कंपनी चालवायला घ्यायची आहे, असे हा तरुण सांगत होता. मात्र, या ग्राहकाचा मोबाइल क्रमांक या तरुणापर्यंत कसा पोहोचला हे गूढ असून, प्रशासन कारवाई केव्हा करणार, कुठपर्यंत हे माफिया सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.