आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता धरणातील थेंबभर पाण्यावरही पालिकेचे लक्ष, गरजेवेळी काम सुरू करण्याचे देणार आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुष्काळाची वाढलेली दाहकता, धरणातून कमी होत असलेले पाणी आणि रोज लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता महापालिकेने अाता आळस झटकून गंगापूर धरणातील थेंबन् थेंब उचलण्याचे नियोजन सुरू केले आहे. चर खोदून तसेच थेट पंपाद्वारे जॅकवेलपर्यंत पाणी उपलब्ध करत ते सहज उचलण्याची तयारी सुरू केली आहे. निविदा काढत संस्थाही अंतिम करण्यास अाताच प्रारंभ केला जाईल. गरज निर्माण होताच कार्यारंभ आदेश देत हे काम केले जाणार असल्याचे मनपाने सांगत शहरवासीयांना दिलासा दिला अाहे.
गेल्या पावसाळ्यात धरण भरलेच नाही. त्यातच मराठवाड्याला सव्वा टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडावे लागल्याने नाशिककरांना माेजूनमापून पाणी शिल्लक राहिले. शिवाय या पाण्याचा योग्य हिशेब ठेवताच पाणी उचलण्याचे मीटर बंद ठेवत मनपा बेहिशेबी पाणी उचलत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यामुळे आता रोज आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षाही जास्त पाणी उचलल्यास त्याचा तोटा नाशिककरांनाच होईल. त्याचे पातक महापालिकेच्याच माथी फोडले जाईल. त्यामुळे महापालिकेने आता आपल्या वाट्याच्या पाण्यासह भीषण टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध सर्व पाणी पिण्यासाठीच धरणात आरक्षित असल्याने हे सर्वच पाणी उचलावेच लागणार असल्याचे गृहित धरले आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून लागलीच त्याची तयारी सुरू आहे.

चर खाेदू, पंपाद्वारेही पाणी उचलणार
^टंचाईची स्थिती पाहता धरणातील मनपाचे सर्वच पाणी उचलावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी चर खोदून तसेच चरामध्ये येणारे पाणी पंपाद्वारे उचलण्यासाठी तयारी आहे. त्याची निविदा आगाऊच काढून तयारीनंतर ऐनवेळी फक्त कार्यारंभ आदेश देणे राहणार अाहे - यू. बी. पवार, अधीक्षकअभियंता, मनपा

दलघफू पाणी उपलब्ध राहाते
गंगापूरसोबतच दारणातही मनपाचे आरक्षण आहे. सध्या दारणात मनपाचे ४७० दलघफू इतके पाणी शिल्लक आहे. त्यामुळे केवळ सर्व पाणी उचलण्याचीच व्यवस्था करणे मनपाला आवश्यक आहे. त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिककरांना चिंता नको
बोअरवेल आणि खासगी विहिरीही होणार अधिग्रहित
आवश्यकता पडल्यास खासगी विहिरी आणि बारवंही अधिग्रहित केले जाणार आहे. २०० ते २२५ विहिरींचा सर्व्हे केला आहे. त्यातील काही विहिरींचीही निवड केली आहे. गरज पडल्यानंतर लागलीच ते पाणी वापरता येणार आहे. वेळ पडल्यास तेथून टँकरही भरून घेण्याची तयारी मनपाने केली आहे.
जॅकवेलपर्यंत सर्वच पाणी उपलब्ध करण्याची तयारी
धरणातील पाणीपातळी खाली गेल्यास जॅकवेलद्वारे पाणी उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे धरणात इतरत्र पसरलेले पाणी एकत्र करत चर खोदून ते जॅकवेलजवळ आणले जाईल. जेणे करून जॅकवेलद्वारे त्याची उचल सहजशक्य होईल. त्यानंतर रोजची पाण्याची उचल पाहता चराद्वारे उपलब्ध करता येणारे पाणीही उचलावेच लागणार असल्याची मनपाची धारणा आहे. त्यासाठी पाण्यात थेट पंप लावूनच त्याची उचल पाइपलाइनद्वारे करत ते पाणी जॅकवेलपर्यंत आणले जाईल. त्यामुळे जॅकवेलखाली मुबलक पाणी असले आणि त्याची उचल करता येईल. याचा फायदा धरणातील पाण्याचा थेंब न् थेंब उचलला जाईल आणि पुढील कालावधीसाठी शहरासाठी योग्य पाणीपुरवठा करता येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.