आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात पाण्यासाठी महिलांनी अभियंत्यांनाच कोंडले कार्यालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या 15 दिवसांपासून जुने नाशिक परिसरातील काही भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
करत येथील महिलांनी थेट हंडा मोर्चा नेत अभियंत्यांनाच कार्यालयात कोंडले. दोन दिवसांत पाणीपुरवठा नियमित न झाल्यास संबंधित अधिका-यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेविका रंजना पवार यांनी दिला.
जुने नाशिक परिसरातील भगवतीनगर, कुंभारवाडा, काजीगढी या परिसरात महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. 15 दिवसांपासून पाण्याचा पत्ताच नाही. नागरिकांसह नगरसेविका पवार यांनी वारंवार अधिका-यांकडे तक्रार केली होती. निवेदनही दिले. परंतु, प्रत्येक वेळी अधिका-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अखेर सोमवारी जिल्हा पोस्ट कार्यालयासमोर पाण्याच्या टाकीखाली असलेल्या महापालिकेच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उपअभियंता एस. एम. माडीवाले यांना कोंडत कार्यालयाच्या दरवाजास बाहेरून ताळे ठोकले. काही वेळानंतर दरवाजा उघडण्यात आला. निवेदन देत चर्चा झाली.
..तर अधिका-यांना काळे फासू - वारंवार तक्रार देऊनही काजीगढी, भगवतीनगर, कुंभारवाडा यासह जुने नाशिक भागातील वॉर्ड क्रमांक 29 मध्ये पाण्याची समस्या नित्याचीच झाली आहे. अनेक महिला पाणी वाहताना पडल्याने जखमी झाल्या आहेत. पालिका अधिकारी कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे अखेर आज कार्यालयावर मोर्चा आणला असून, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास चोपही दिला जाईल. रंजना पवार, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक 29
निर्णय घेऊ - महिलांच्या तक्रारीनुसार संबंधित परिसरास प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली जाईल. तीन दिवस त्याचे निरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर नेमकी समस्या काय आहे, याची पडताळणी करून योग्य तो निर्णय प्रशासन नक्कीच घेईन. उदय धर्माधिकारी, अभियंता