आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Released Towards Jayakwadi Under Police Protection

नाशिकने रोखलेले पाणी ३५० पोलिसांच्या पहाऱ्यात जायकवाडीकडे झेपावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही बंदूकधारी, काही काठ्या घेतलेले, तर समोरून जमावाने दगडफेक केलीच तर बचावासाठी ढाल अशा जामानिम्यासह सज्ज ३५० पोलिसांचा गंगापूर गाव ते धरणापर्यंत खडा पहारा ठेवून अखेर सोमवारी गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पुन्हा एकदा पाणी सोडण्यात आले. दुपारी १२ वाजता ५४३ क्युसेकने विसर्ग सुरू झाला, दुपारी १ वाजेपासून १०८८ क्युसेकपर्यंत तो वाढवण्यात आला. पाण्याचा विसर्ग सुरू होता. दरम्यान, पाणी साेडण्याच्या निर्णयाला अाव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी हाेणार अाहे.

गंगापूर, दारणा धरणातून रविवारी रात्रीच पाणी सोडण्यात आले, परंतु सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी थयथयाट करत गंगापूरचे पाणी दीड तासातच बंद पाडले होते. बंदोबस्तासाठी धुळ्याचे २०० पोलिस मागवण्यात आले आहेत. दोन्ही धरणांतून सोडलेल्या पाण्यापैकी ६० टक्क्यांवर पाणी पोहोचेल, असे पाटबंधारेचे सहायक अभियंता एन.डी. महाजन म्हणाले.

... समजा मराठवाड्याने वीजपुरवठा रोखला तर?
औरंगाबाद | नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वांचाच हक्क आहे. त्यात दुजाभाव करून वाद होऊ नयेत. पाणी सोडण्यास होणारा विरोध चुकीचा आहे, असे स्पष्ट करतानाच समजा उद्या चंद्रपुरात तयार होणारी वीज पश्चिम महाराष्ट्राला जाऊ द्यायची नाही असे ठरवून मराठवाड्यातील लोक विजेच्या टाॅवरवर चढून बसले तर...?, असा सूचक सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केला. जायकवाडी पाणीप्रश्न व भविष्यातील मराठवाड्याचा विकास या विषयावरील सर्वपक्षीय परिषदेत बागडे बोलत होते.

पाणी थांबणार नाही : जलसंपदामंत्री
मुंबई | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय मागे घेणे शक्य नाही. नाशिकच्या नेत्यांची पाणी न सोडण्याची विनंती होती. पण मी पालकमंत्री असलो, तरी राज्याचाही मंत्री आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. न्यायालयाचे पाणी साडण्याचे आदेश नाहीत, त्यामुळे सरकार निर्णय बदलू शकते का यावर ते म्हणाले, तसे करायचे तर सरकारला हायकोर्टात जावे लागेल, पण तसा विचार नाही.

मुळा धरणाचे पाणी राहुरीपर्यंत
नगर | मुळा धरणातून रविवारी रात्री सोडलेला जलौघ ५,७०० दलघफू वेगाने झेपावत असून, सोमवारी रात्री ७.३० वाजेपर्यंत राहुरी तालुक्यातील मांजरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. आतापर्यंत २८० दलघफू विसर्ग झाला असून, एकूण १,७४० दलघफू होणार आहे. सोमवारी विसर्ग वाढवण्यात आला. तथापि, दरवाजातून १,१८७ दलघफूच पाणी सोडता येणार असल्याने उरलेले ५५९ दलघफू पाणी कसे, द्यायचे असा पेच आहे. कालव्याने पाणी देण्याचा विचारही सुरू आहे. पण यामार्गे पाणी पोहोचण्यात अडचणी आहेत.