आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा पाणी कपातीचा , पाणीगळती रोखून भविष्यासाठी आजपासूनच सुधारणा गरजेची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर आणि दारणा धरणात महापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी पुरेसे असूनही केवळ निष्काळजी नकारात्मक भूमिकेमुळेच पाणीकपातीची वेळ आली. वितरणातील गळती कमी करून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केला तरीही नाशिककरांवर टंचाईची वेळ येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. दुष्काळी स्थितीमुळे पाणीकपातीस विरोध नाही, पण वितरणातील त्रुटी तसेच चोरी थांबवित त्यात स्पष्टता यावी, असेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगत महापालिकेने भविष्याच्या दृष्टीने आजपासूनच सुधारणा करण्यास सुरुवात करण्याचे स्पष्ट मतही या वेळी व्यक्त केले.
कमी पडलेला पाऊस, जायकवाडीला सोडावे लागलेले पाणी यामुळे गंगापूर धरणामध्ये पुरेसे पाणी नसल्याचे कारण देत महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केली. प्रत्यक्षात पाणीकपात लागू करूनही वितरणातील मोठ्या प्रमाणावरील गळतीमुळे आवश्यकतेपेक्षा जादा पाणी मनपा उचलत असल्याने पाणी बचत झालीच नाही. मनपा २० टक्के गळती होत असल्याचे सांगत असली, तरीही प्रत्यक्षात ही गळती ३० ते ३५ टक्के होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शिवाय त्यांचे रोजच्या पाण्याची उचल करणारे मीटरही बंद असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले. त्यामुळे केवळ आपली चूक लपविण्यासाठीच तोंडदिखावा म्हणून पाणीकपात केली जात असल्याचे धरणांत उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यात दारणा आणि गंगापूर धरणांमध्ये सर्वच गळती, तूट आणि पाणी वापर संस्थांचे आरक्षण वजा करूनही उपलब्ध असलेले पाणी ३१ जुलैनंतरही पुढील २१ दिवस जादा पुरू शकेल, पण त्यासाठी गळती रोखणे गरजेचे आहे. पारदर्शकता यावी म्हणून हीच बाब ‘दिव्य मराठी’ने आकड्यांसह शहरवासीयांच्या निदर्शनास आणून देत सलग पाच दिवस त्यावर प्रकाशही टाकला. त्यामुळे भविष्यातील पाण्याची वाढती गरज, समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याने वाढलेली डोकेदुखी आणि नाशिककरांच्या हक्काचे कमी कमी होत चाललेले पाणी याचा विचार करता आताच महापालिकेने आवश्यक त्या सुधारणा करण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

{ गंगापूर, दारणा धरणातून उचललेल्या पाण्याच्या थेंब न् थेंबाचा अचूक हिशेब असावा. त्यासाठी उच्च दर्जाची यंत्रसामग्री असावी.
{ जलशुद्धीकरण केंद्रातून विविध ८५ ठिकाणच्या पाणीपुरवठ्याच्या टाक्यांमध्ये दिलेल्या पाण्याचा हिशेब असावा.
{ प्रत्येक टाकीतून तिची क्षमता गृहित धरता टाकीतून किती पाणी वितरित झाले यासाठी प्रत्येक टाकीवर मीटर बसवावे.
{ प्रत्येक नळजोडणीला मीटर बसवित त्याची नियमित तपासणी करावी.
{ वॉटर अकाउंट आणि वॉटर अॉडिट नियमित जाहीर करावे. त्याचा तांत्रिक सर्व्हेही करावा.
{ घरगुती जोडणी आणि वाणिज्य जोडणी जाहीर करावी. चोरी थांबवावी.
{ पुरवठा केलेल्या पाण्याच्या तुलनेत आलेल्या पाणीपट्टीची पडताळणी करावी.
{ दारणातील पाणी उचलण्यासाठी चेहडी पंपिंग स्टेशनची क्षमता वाढवावी.
{ मुकणेतून त्वरित पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी.

तूट कमी करावी
^पाणी वितरणातील तूट कमी करावी. वॉटर अकाउंट नियमित करावे. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीत आणण्यास विलंब आहे. दारणातील पाणी उचलण्यासाठी त्वरित कार्यक्षम यंत्रणा बसवावी. - अ. ना. म्हस्के, निवृत्तअभियंता, जलसंपदा विभाग

गळती रोखावी
^पाण्याची गळती आणि चोरी थांबविणे आवश्यक आहे. वितरणातील गळतीच ३० टक्क्यांवर आहे. ती कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पंपिंग ते नळाच्या जोडणीपर्यंत १०० टक्के मीटर बसवावे. मुकणेची योजना पूर्ण करावी. - राजेंद्र जाधव, अभियंता