आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात २० सप्टेंबरपासून फक्त एकवेळ पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाने दिलेली अाेढ, धरणातून झपाट्याने कमी हाेणारा पाणीसाठा साधुग्राममधील पाण्याची उधळपट्टी लक्षात घेता शहरात २० सप्टेंबरपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे अादेश स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी गुरुवारी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अाक्रमक हाेत निर्णय घेत सत्ताधारी मनसे महापाैरांनाही एकप्रकारे दणका दिल्याचे चित्र अाहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका नीलिमा अामले यांनी स्थायी समिती सभेत लेखी पत्र देऊन शहरात टंचाईच्या पार्श्वभूमीवर एकवेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वच सदस्य गंभीर झाले. यशवंत निकुळे यांनी साधुग्राममध्ये माेठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय हाेत असल्याचे सांगत पाण्याची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी केली. शाही पर्वणीच्या एक दिवस अाधी पाणी साेडण्यापेक्षा मध्यरात्रीनंतर पाणी साेडावे, अशी मागणी त्यांनी केली. मेघा साळवे यांनी सिंहस्थापेक्षा नाशिककर महत्त्वाचे असून, पाणी कपातीची गरज असल्याचे स्पष्ट केले. सुरेखा भाेसले यांनी एकवेळ पाणी देताना त्याचा दाबही चांगला राहिला पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. रत्नमाला राणे यांनी सिडकाेत एकवेळ पाणीपुरवठा असल्याचे सांगत शहरातील अन्य भागातही त्याप्रमाणेच पाणी पुरवावे, अशी मागणी केली. त्यानंतर सभापती चुंभळे यांनी साधुग्राममध्ये पाणी गळती अधिक असल्याचे सांगत त्यावर नियंत्रण मिळवावे, तसेच तिसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीनंतर शहरात एकवेळ, परंतु संपूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, असे अादेश दिले अाहेत.

जिल्ह्यातील पाणीकपातीबाबत आठवडाभरात अंतिम निर्णय
यंदा सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस पडला आहे. धरणांतही ३१ टक्के पाणी असून, पुढील दहा महिने ते पिण्यासाठी लागणार असल्याने शेतीसाठी गरज असली तरीही ते देता येणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही आंदोलन, मोर्चे अथवा कुठल्याही प्रकारे दबाव आणून शेतीसाठी पाण्याची मागणी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी येथे करत, येत्या आठवड्यात पाऊस झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केलेे. त्यामुळे आता १९ सप्टेंबरला निफाडसह इतर परिसरात शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी पावसावर त्याचे गणित अवलंबून राहील.

पाण्याचाकमीसाठा तसेच २५ वर्षांतील प्रथमच उद‌्भवलेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पाणी नियोजनाची बैठक झाली. यंदा वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांपुढेही पिके वाचवि‌ण्याचे आव्हान निर्माण झाल्याने धरणांतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु, धरणांतील पाण्याचा साठा पाहून बैठकीत निर्णय घेण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, बैठक सुरू असताना बाहेर संभाजी ब्रिगेडने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेती पिण्यासाठी पाणी मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबजी करत आंदोलन केले.

धान्य आणि रोजगार उपलब्धतेचे आदेश
पाणी नसल्याचे रोजगार नाही. त्यामुळे उपासमारीची तसेच स्थलांतराचीही वेळ मजुरांवर आल्याने रोहयोची कामे सुरू केली जातील. महसूल, कृषीबरोबरच जलसंपदा, वनविभाग तसेच बांधकामाचीही कामे उपलब्ध करून स्थानिक ठिकाणीच रोजगार दिला जाईल. त्याचबरोबर १०० टक्के धान्य रेशनवर उपलब्ध करून देण्याचे अाश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

शंभर प्रकल्पांना सुधारित मान्यता
या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊनच सर्वच पाणी वापर संस्थांच्या पाण्यात कपात करण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. अंदाजानुसार पाऊस झाल्यास विविध नगरपरिषदा, तालुक्यांच्या पाण्यात कपात करण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, तसे झाल्यास भविष्यात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकची वाढती लोकसंख्या पाहता पुढील ३० ते ४० वर्षांसाठी पाण्याचे नियोजन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. नाशिकच नव्हे तर राज्यातील अनेक प्रकल्प रखडून आहेत. त्यामुळे जवळपास १०० प्रकरणांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचाही निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचणी तपासून याबाबत लवकरच निर्णय होईल.
कुंभच नव्हे तर दुष्काळाबाबतही दक्ष
कुंभमेळा हा १२ वर्षांनंतर येणारा जागतिक सोहळा आहे. त्यामुळे भाविकांना स्नानासाठी पाणी देणे आवश्यक आहे. त्यासाठी आरक्षित सर्वच पाणी सोडता केवळ १०० दलघनफूट पाणी दोन पर्वण्यांसाठी सोडले जाणार अाहे. हे पाणी वाया जाणार नसून खालील धरण, तलावांत ते साठलेच जाणार असल्याने तेही उपयोगात येणार आहे. त्याचबरोबर दुष्काळाकडेही लक्ष असून, त्याचेही नियोजन केले जात अाहे. त्यामुळे केवळ विरोधास विरोध किंवा आरोप करता सत्य परिस्थिती तपासून पाहण्याचा सल्लाही महाजन यांनी विरोधकांना दिला.
तिन्ही खोऱ्यांत पाण्याची तूट
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने गिरणा, गोदावरी, तापी या तिन्ही खोऱ्यांमध्ये पाण्याची तूट आहे. गिरणात अवघा टक्के जिवंत पाणीसाठा असून, हीच स्थिती इतरही खोऱ्यांची असल्याने आता आवर्तन दिल्यास पुढे मोठी चिंता होईल. त्यामुळे पाणी कपातीस सर्वांनीच सहकार्य करावे.
- एकनाथ डवले, विभागीय अायुक्त
चाऱ्याचे फेरसर्वेक्षण
जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात पुढील दोन महिने चाऱ्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु, आमदारांनी त्याबाबत आक्षेप घेत वस्तुस्थिती वेगळी असून, चार-पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरेल एवढा चाराच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश देत दाेन-तीन दिवसांतच अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

वनबंधाऱ्यांची होणार चौकशी
इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही वनविभागाच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांत पाणीच साचत नाही. यावर आमदार जे. पी. गावित आणि निर्मला गावित यांनी तक्रार करताच पालकमंत्र्यांनी चौकशीसह दोषींवर कारवाईचे आदेश दिले.
मांजरपाड्याची मंजुरी महिनाभरात
दुष्काळाचे संकट, भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता मांजरपाडा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेत महिनाभरात प्रकल्पाची मंजुरी घेतली जाईल. या प्रकल्पाकडे गेल्या चार वर्षांत कोणीच लक्ष घातले नाही. परंतु, मी वैयक्तिक लक्ष घालत तो पूर्ण करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मराठवाड्याची मांडली व्यथा
नाशकात पाण्याची समस्या कठीण होत असली तरीही मराठवाड्यात मात्र अत्यंत भीषण परिस्थिती आहे. तेथे आताच दाेन हजार टँकरणे पाणी पुरविले जात असून, पुढील काही महिन्यात तर थेट रेल्वेनेच पाणी पुरविण्याची वेळ येणार असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी मराठवाड्याची व्यथा मांडली. नाशिकमधील धरणात ३१ टक्के पाणीसाठा असून, त्या तुलनेत मराठवाड्यात अवघे टक्केच पाणी शिल्लक आहे. आताच तेथे १०० कि.मी.वरून पिण्यासाठी टँकरने पाणी आणले जात अाहे. नाशिकमधील मनमाड, नांदगाव, येवल्यामधील पाण्याची स्थिती कठीण होणार असल्याने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक अाहे. तसेच आणेवारी जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेले मराठवाड्याचे निकष नाशिक जिल्ह्यातही लागू करण्याबाबत त्यांनी अाश्वासन दिले.
निकष तपासून दुष्काळाबाबत निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर आता राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत सर्व निकष तपासूनच मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या सूचना
रोहयोची कामे त्वरित करा, कर्जवसुलीची सक्ती नको, भारनियमन करू नका, शेतकऱ्यांकडे वीजबिलांसाठी तगादा लावू नका, पीकविमा लाभ द्या, टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांनाच असून, त्यांनी मागणीनुसार त्वरित टंँकर सुरू करावेत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी मुख्यालयीच थांबावे, शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलणार नाही, यासाठी त्यांचे मनोबल उंचवावे.