आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात सरसकट मंगळवारचा ‘ड्राय डे’ तूर्तास अनिश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात सरसकट सर्वत्र अाठवड्यातून एक दिवस, मंगळवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय रद्द हाेण्याची शक्यता असून त्याएेवजी महापालिकेच्या सहा विभागात स्वतंत्ररित्या अाठवड्यातून वेगवेगळ्या एके दिवशी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय हाेण्याची शक्यता अाहे. संपूर्ण शहराचे पाणी एक दिवस बंद राहिले, तर जलवाहिन्यांमध्ये हवेचा दाब निर्माण हाेणे दुसऱ्या दिवशी विस्कळीत पाणीपुरवठा हाेण्यासारख्या तांत्रिक अडचणी पुढे करून सहा विभागात स्वतंत्र पाणी बंदचा फाॅर्म्युला पुढे अाणण्यात अाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
मराठवाड्याला गंगापूर धरणातून पाणी साेडल्यामुळे नाशिककरांच्या ताेंडचे पाणी पळाल्याचे चित्र अाहे. महापालिकेचे जवळपास १५०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षण घटले असून सद्यस्थितीत १५ टक्के पाणीकपात सुरू राहिली तरी, जूनच्या उत्तरार्धात पाणी संपण्याची भीती अाहे. त्यामुळे अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले तरी, ३१ जुलैच्या हिशाेबानुसार २० दिवसांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण हाेईल.

दरम्यान, महापाैर अशाेक मुर्तडक यांनी अाठवड्यातून एक दिवस, म्हणजेच मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे अादेश अायुक्तांना दिले हाेते. अायुक्तांनी जलसंपदा खात्याकडून शिल्लक पाण्याची अाकडेवारी अाल्यानंतर निर्णय घेऊ, असे जाहीर केले हाेते. प्रत्यक्षात, अायुक्तांवर भाजपचा किंबहुना पालकमंत्र्यांचा दबाव असल्याची चर्चा हाेती. एक दिवस पाणी बंद राहिले तर भाजपला पुढे निवडणुकीत फटका बसेल अशी भीती हाेती. त्यामुळे २६ जानेवारीपासून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेऊ शकली नाही, असे सूत्रांचे म्हणणे हाेते. दरम्यान, पाण्याचा मुद्दा तापत असल्याचे बघून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (दि. २६) अाढावा घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर, विभागीय अायुक्त एकनाथ डवले यांच्याकडे बुधवारी (दि. २७) महापाैर, उपमहापाैर, महापालिका अायुक्त, भाजप अामदारांची बैठक झाल्याचे वृत्त अाहे. त्यात खुद्द विभागीय अायुक्तांनीच एक दिवस शहराचे पाणी बंद ठेवणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरेल असे सांगितल्याचे समजते. कपात करणे गरजेचे असल्याबाबत सर्वांचे एकमत झाले असून त्यासाठी विभागनिहाय पाणी बंद ठेवण्यासाठी स्वतंत्र दिवस निवडण्याचा प्रस्ताव सर्वमान्य झाल्याचेही समजते.

दाेन दिवसात निर्णय, ताेपर्यंत ताेंडावर बाेट
पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाण्याच्या मुद्यावरून चांगलीच गरमागरमी झाल्याचे सांगितले जाते. भाजप अामदारांनी प्रशासनाकडूनच पाण्याचा मुद्दा तापवला जात असल्यासारख्या तक्रारी केल्या गेल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. महाजन यांनी त्याची दखल घेत दाेन दिवसात याेग्य निर्णय घेण्याचे अादेश प्रशासनाला दिल्याचे सांगितले जाते. त्याबाबत अधिकृत प्रेस नाेटच जारी केली जाणार अाहे. ताेपर्यंत काेणीही प्रतिक्रिया वा माहिती देऊ नका असे सांगत ताेंडावर बाेट ठेवण्याची सूचना केल्याचे वृत्त अाहे.