नाशिक - गंगापूर धरणात मुबलक पाणी असूनही एेन उन्हाळ्यात पाणीपुरवठा हाेत नसल्याने संतप्त झालेले काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी स्थायी समिती सभेत गांधीगिरी करीत उपायुक्त राेहिदास बहिरम यांना माठ भेट दिला. पाणीपुरवठ्याची समस्या सुटल्यास तीव्र अांदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत अाहेत. गंगापूर धरणात मुबलक पाणी असूनही शहरवासीयांना अपुरा विस्कळीत पाणीपुरवठा हाेत अाहे.
मध्यंतरी महासभेतही शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटला हाेता, याचबराेबर निधीची चणचण अन्य कारणे देत मूलभूत कामांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी अाहेत. मध्यंतरी दिवे यांनी अापल्या प्रभागातील स्थानिक नागरिकांसमवेत महापालिकेत येऊन पाणीपुरठ्याप्रश्नी अांदाेलनाचा इशारा दिला हाेता. मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे स्थायी समिती सभेत गांधीगिरी करीत माठाची भेट दिली. त्यानंतर सभापती शिवाजी चुंभळे यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अादेश दिले.
माेफत अंत्यसंस्कार याेजनेवरून गाेंधळ : एकीकडे माेफत अंत्यसंस्कार याेजनेचा ठराव चुकीचा असल्याचे कारण देत शासनाकडून विखंडित करण्यासाठी पाठवला असताना, दुसरीकडे मात्र या याेजनेसाठी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांना तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर अडल्यामुळे गाेंधळ उडाल्याचे चित्र दिसून अाले.
या वादात नगरसेवकांनी ठेकेदारांची बाजू लावून धरल्यामुळे अखेर वादग्रस्त विषय तहकूब करण्यात अाला. या वादात मनसे विरुद्ध काँग्रेस असे चित्र दिसून अाले. नगरसेवक यशवंत निकुळे यांनी हिरवे यांची, तर दिवे यांनी मालपाणी यांची बाजू लावून धरल्यामुळे प्रशासनाची काेंडी झाल्याचे दिसत हाेते.
गाळ्यांच्या पुनर्लिलावाचा प्रस्ताव तहकूब
महापालिकेचे बाराशेहून अधिक गाळे नाममात्र दराने दिल्यामुळे जवळपास आठ काेटी रुपयांचा ताेटा हाेत असल्याचे कारण देत या गाळ्यांसाठी चालू बाजारमूल्याप्रमाणे भाडे निश्चित करावे पुनर्लिलाव करून भाडेकरूंना ताब्यात द्यावे, असा प्रशासनाचा प्रस्ताव तहकूब करण्यात अाला. त्यात बेराेजगारांनी यापूर्वी थाटलेले व्यवसाय उद्ध्वस्त हाेतील, अशी भीती व्यक्त करण्यात अाली. दरम्यान, गाळ्यांची थकबाकी, विनावापर पडून असलेले गाळे अादींची माहिती सभापतींनी मागवली अाहे.
फोटो - स्थायीच्या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठाप्रश्नी नगरसेवक राहुल दिवे यांनी उपायुक्त राेहिदास बहिरम यांना माठ भेट दिला.