आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आजपासून एकदाच पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहरात सोमवार(दि. 7)पासून जवळपास 15 टक्के पाणीकपात लागू होणार आहे. सिडको, सातपूरबरोबरच पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व व पश्चिम विभागात दिवसातून एकदाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.जुलै महिना उजाडल्यावरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाऊस लांबला, तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर महापौर अँड. यतिन वाघ यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन रोज 60 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार, 7 जुलैपासून पाणीकपात लागू होणार असून, सिडको, सातपूरबरोबरच चारही उपनगरांत दिवसातून एकदाच पाणी येईल.
प्रामुख्याने तीन ते साडेतीन तास पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने केले जात आहे. नाशिकरोड विभागात पहाटे 5 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल. तर, सिडकोत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा होईल.
नगरसेवकांकडून एसएमएस : पाणीकपातीबाबत नागरिकांना कल्पना देण्यासाठी बहुतांश नगरसेवकांनी एसएमएस करण्याचा फंडा राबवला. या संदेशात 7 जुलैपासून दिवसातून एकदाच पाणी येईल, याबाबत कल्पना दिली जात होती. त्याबरोबरच पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्याचा पर्यायही दिला जात होता.