आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल पर्यटन: गोदावरीत बोटिंगचा प्रस्ताव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी नदीचे प्रदूषण कमी होऊन सोमेश्वर ते तपोवन हा नदीपात्राचा मार्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी टप्प्याटप्प्यात बोटिंग सुरू करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यासाठी लवकरच प्रस्ताव सादर करून निविदा मागविण्यात येणार आहेत. महापालिकेची ही कल्पना साकार झाल्यास नाशिककरांसाठी एक चांगली पर्वणी मिळू शकणार आहे.

गोदावरी नदीच्या प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गोदावरी कृती आराखड्यांतर्गत तीन नवीन एसटीपी प्लान्ट (मलजलशुद्धीकरण केंद्र) तसेच पाणवेली आणि निर्माल्य काढण्यासाठी पाण्यावरील तीन घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. रामकुंड परिसरातही खास पथके तैनात करून गोदापात्राची स्वच्छता केली जात आहे. सोमेश्वर ते तपोवन या भागात सर्वाधिक प्रदूषण होत असल्याने नेमके हाच भाग नजरेसमोर ठेवून महापालिकेने या भागात बोटिंग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला असून, त्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. तीन टप्प्यात बोटिंग सुरू करण्याचे प्रस्तावित असून, यासंदर्भात महासभेची मंजुरी घेऊन लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोटिंगचा प्रस्ताव दिल्या जाणार्‍या संबंधित संस्थेकडेच गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी निश्चित करून दिली जाईल. यामुळे बोटिंगबरोबरच गोदापात्र स्वच्छ राखण्यासाठीदेखील या उपक्रमाचा उपयोग होणार असून, नाशिकमध्ये एक चांगले पर्यटनस्थळही विकसित होणार आहे.