आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणातून पाणी सोडले परंतु गेट बंद करायला विसरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - देवळा तालुक्याचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी सोमवारी चणकापूर धरणातून 60 क्युसेक पाणी सोडण्यात आले; मात्र पाटबंधारे विभागाच्या जबाबदार असलेला कर्मचारीवर्ग व संबंधित अभियंत्याने पाण्याचे महत्त्व लक्षात न घेता सगळे गेट बंद करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत चार दशलक्ष घनफूट पाणी आपत्कालीन गेटद्वारे वाहून गेले. परिणामी देवळा तालुक्याला पाण्यासाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कळवण तालुक्यातील चणकापूर धरणात 70 टक्के साठा झाल्यामुळे व देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता तालुक्यातील रामेश्वर धरण भरण्यासाठी चणकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे 60 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने उजव्या कालव्याची कुठलीही दुरुस्ती केली नाही. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर असलेले आपत्कालीन गेट व्यवस्थित बंद करणे व त्या गेटला कुलूप लावणे हे संबंधीत विगाभाला गरजेचे असते; मात्र कळवण पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या 100 फूट अंतरावरील कोल्हापूर फाट्यावर एक आपत्कालीन गेट उघडे होते व या गेटमधून चार दशलक्ष घनफूट पाणी बेहडी नदीत गेल्यामुळे रामेश्वर धरणात पाणी जाण्यास उशीर झाला आहे.
अधिकारी नाशिकला - या विभागाचे काम पाहणारे अधिकारी मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग दुर्लक्ष करतो. अंतरावरील चणकापूर उजवा कालव्याचे आपत्कालीन गेट उघडे राहून सायंकाळी 6 ते दुपारी 1.30 पर्यंत चार दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले. गेटला कुलूप लावून रात्रपाळी कर्मचार्‍यांनी पहारा करण्याची गरज असताना गेटला कुलूप न लावता पाणी वाया घालणे म्हणजे दुर्लक्ष आहे.
पाटबंधारे विभागाची चूक - दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे महत्त्व मोठे असून, पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे होते. आवश्यक तेथे कर्मचारी उभे करणे गरजेचे असताना दुर्लक्ष झाल्याने पाण्याचा अपव्यय झाला. पाटबंधारे विभागाने जर पोलिस बंदोबस्त मागितला असता तरी आपण विचार केला असता यामुळे ही चूक त्याचीच असून, दोषींवर कारवाई व्हावी. - बाळासाहेब गाढवे, तहसीलदार
मुद्दाम केलेला प्रकार - आपण सगळे गेट बंद करण्याचे आदेश संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना दिले होते; मात्र कोल्हापूर फाट्यावरील आपत्कालीन गेट उघडा राहिला किंवा मुद्दाम केलेला प्रकार वाटतो. - एस. बी. ठाकूर, उपअभियंता, चणकापूर कालवा