आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटरग्रेस कंपनीचा कोटींचा ठेका रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्रामच्या स्वच्छतेचा पाच कोटी रुपयांचा ठेका मिळवण्यासाठी पात्र असलेल्या वॉटरग्रेस लिमिटेड या कंपनीकडील काम काढून घेण्याचे आदेश स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी देत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरील पात्र ठेकेदारांशी तडजोड करून कमी दरात कामाची जबाबदारी द्यावी, अशा सूचना दिल्या. महापालिकेची ९५ लाखांची थकबाकी तसेच काळ्या यादीतून त्यांना वगळल्याबाबत तत्कालीन आयुक्तांनी स्थायी समितीच्या ठरावाला दिलेली प्रशासकीय मंजुरी याबाबत उलगडा होत नसल्यासारखी कारणे देत ‘वॉटरग्रेस’ला वगळण्याचा निर्णयही झाला.
मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत जादा विषयात आलेल्या साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्याला मंजुरी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, संबंधित ठेकेदाराकडे ९५ लाख रुपयांची थकबाकी असल्याबाबतचा लेखापरीक्षण अहवाल, तसेच फाळके स्मारकातील उपाहारागृहाच्या कामकाजावरून काळ्या यादीत टाकण्याबाबत झालेली कारवाई आदी मुद्यांवरून संबंधित ठेकेदाराकडील काम काढून घेण्याची मागणी करीत प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शनिवारी दुपारी स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी मनसे नगरसेविका मेघा साळवे यांनी वादग्रस्त ठेकेदाराला काम देण्यास विराेध करीत तातडीचे काम असेल तर दुसऱ्या पात्र ठेकेदाराला संधी द्या, अशी मागणी केली. त्यानंतर प्रा. कुणाल वाघ यांनी संबंधित ठेकेदाराकडे असलेली थकबाकी त्यास काळ्या यादीतून स्थायी समितीने वगळले असेल तर त्यास आयुक्तांनी दिलेली प्रशासकीय मंजुरी आदी माहिती देण्याबाबत मागणी केली. मात्र, आराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्याकडे ही माहिती नसल्यामुळे ठेकेदाराला नियमित यादीत समावेश केल्याचा पुरावा उपलब्ध झाला नाही.
दरम्यान, व्याजासहित असलेली दोन कोटींची थकबाकी भरून काम द्यावे किंवा अन्य पात्र ठेकेदारांशी तडजाेड करून कमी दरात काम द्यावे, असा प्रस्ताव वाघ यांनी मांडला. नीलिमा आमले यांनीही काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देऊ नये द्यायचे असेल तर जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना केली. दरम्यान, राहुल दिवे यशवंत निकुळे यांनी प्रशासनाकडे वारंवार सांगूनही प्रस्तावातील स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याकडे लक्ष वेधले. एकूणच प्रकरणात संशयाची सुई स्थायी समितीवर येत असून, या पार्श्वभूमीवर सुधारित प्रस्ताव येत नसल्यामुळे संबंधित ठेक्याचे काम वॉटरग्रेसला देऊ नये, अशी मागणी केली. दरम्यान, सभापती चुंभळे यांनी वॉटरग्रेसला काम देता, दुसऱ्या पात्र ठेकेदाराशी प्रशासनाने चर्चा करावी, त्याने कमी दरात काम केल्यास तिसऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधावा, अशी मागणी केली. महापालिकेला पोषक अशा खर्चात काम झाल्यास पुन्हा निविदा द्यावी अशी सुचना दिल्या.

मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये भडका
सिडकोच्या सहाव्या योजनेच्या हस्तांतरणाची बैठक आटोपून परतताना ‘रामायण’ या महापौरांच्या निवासस्थानी मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून चांगलीच हमरातुमरी झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, महापौर अशोक मुर्तडक यांच्याशीच थेट शाब्दिक वाद झाल्यावर प्रकरण चिघळले होते. त्यातून मनसेतील पूर्वाश्रमीच्या नेत्यांच्या गटाकडून होणाऱ्या कुरापतीबाबत महापौरांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अखेर मनसेच्या काही नगरसेवक उपस्थितांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांसमवेत चहापानाद्वारे समजूत काढण्याचा प्रयत्नही झाला. प्रकरण जवळपास मिटले असताना पुन्हा अचानक काही कारणामुळे भडका उडाल्याचे सांगितले जाते. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर त्यावर सामंजस्याने पडदा टाकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आता आयुक्तांची कसोटी
स्थायीने‘वॉटरग्रेस’ला ठेका नाकारल्याने आता आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा पद्धतीने प्रथम ठेकेदाराला नाकारून दुसऱ्याला काम देता येते का, अशा विविध मुद्यांबाबत काय घडते, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, ‘वॉटरग्रेस’ न्यायालयात जाण्यच्या शक्यतेने पालिकेला कायदेशीर लढा देण्याबाबत सूचना दिल्या.
‘वॉटरग्रेस’चा घंटागाडीचा ठेकाही वादात
शहरातील जैविक कचरा उचलण्यापोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी असतानाही २००९ मध्ये याच कंपनीकडे घंटागाडीचा ठेका प्रशासनाने दिलाच कसा, असा मुद्दा उपस्थित करीत प्रा. वाघ दिवे यांनी संबंधित कामकाजही रद्द करावे, अशी मागणी केली. एकीकडे इमानदार ठेकेदारांवर नियमांचा बडगा, तर थकबाकीदार ठेकेदारांचे पाेषण करण्यामागे नेमके कोण, असाही सवाल त्यांनी केला.