आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटा, वजन-मापे खात्याची कारवाई तक्रारीअभावी थंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - घाऊक अणि ठोक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी वजन-मापे विभागाने कारवाईचे आदेश दिले होते. त्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, तक्रारींअभावी कारवाई थंडावली आहे.

ग्राहकांना वस्तू विक्री करताना ती कमी वजनाची देऊन फसवणूक केली जाते. फसवणुकीचा प्रकार लक्षात येऊनही वेळेअभावी ग्राहक तक्रार करत नाही. बाजारात विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध आहेत. दुधाचे भाव वाढल्याने त्यापासून तयार करण्यात येणार्‍या मिठाईचेही भाव वाढले आहेत. मिठाई दुकानदार सरासरी पाच ते दहा ग्रॅम मिठाई कमी देऊन ग्राहकांकडून संपूर्ण पैसे वसूल करतात. गर्दी आणि वेळेअभावी ग्राहक याकडे लक्ष देत नाही. याचा फायदा घेत वजनातदेखील ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वैधमापन शास्त्र विभागाकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, एकाही ग्राहकाने विभागाकडे संपर्क साधला नाही.

अशी टाळा फसवणूक
निव्वळ मालाचा आग्रह धरा, बंद पाकिटाचे वजन करून घ्या, वजनकाटा बरोबर आहे की नाही याची खात्री करा, किलोमध्ये मिठाई घेत असल्यास बॉक्सचे वजन वेगळे करा, नगावर घेत असल्यास नगदेखील मोजून घ्या आणि वजन किंवा नग कमी भरल्यास विभागाशी संपर्क साधावा.

तक्रारदारांमध्ये निरुत्साह
विभागाचे निरीक्षक गोपनीय पद्धतीने लक्ष ठेवून असतात. गैरप्रकार आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यात येतो. दंडात्मक कारवाई होते. ग्राहक अजूनही जागृत होत नाही. ग्राहकांकडून तक्रारी आल्यास कारवाई केली जाते. एस. एस. शिंदे, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग

अशी होत असते फसवणूक
निव्वळ मिठाईचे वजन न करता, बॉक्ससह वजन करतात. किमान 10 ग्रॅम मिठाई कमी मिळते. तयार बॉक्समध्ये 100 ते 200 ग्रॅम मिठाई कमी दिली जाते, तर किराणा माल वजन करून प्लास्टिकच्या बॅगमध्ये विक्री केला जातो.

असे आहेत नियम
निव्वळ मालाचे वजन करणे, दर्शनीभागात मुद्रांक भरल्याची पावती लावणे, बॉक्सवर आकार, (वजन), बनवणार्‍याचा पत्ता, संपर्क क्रमांक, माल बनविल्याच्या दिनांकाचा उल्लेख असावा.