आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन रडारवर, एसपीं'च्या सूचना, डीवायएसपी रोहदिास पवार करणार चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गेल्या काही काळात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या काळात काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचंड प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या, त्यामुळे तणावात आणखीनच भर पडल्याचे पोलिस सर्वेक्षणात समोर आले. त्यामुळे काही व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या आठवड्यात शहरातील काही ग्रुप अॅडमिनची चौकशी केली जाणार आहे.

सलग घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगवले गेले. मात्र, खुनाच्या घटना वैयक्तिक वादातून घडल्या आहेत. या घटनांना गँग-वॉरची पार्श्वभूमी नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर वेळोवेळी टाकण्यात आलेला मजकूर आणि छायाचित्रांमुळे, सामाजिक अस्थिरतेला चालना मिळाल्याचे समोर आले. या काळात अनेक अफवा व्हॉट्सअॅपद्वारे पसरवण्यात आल्या. तसेच ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला नाही, अशांचेही फोटो लोड करण्यात आले. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना पोलिस चौकशीच्या फेऱ्यात आणले जाणार आहे. आगामी दोन दिवसांत संबंधित ग्रुप अॅडमिनच्या चौकशीला सुरुवात केली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्या ग्रुप अॅडमिनसह त्या ग्रुपमधील सदस्यांवरही आयटी अॅक्टनुसार कारवाई होईल.

व्हॉट्सअॅपवर हे टाळा
आरोपींचे,मृत व्यक्तींचे छिन्नविछिन्न अवस्थेतील फोटो टाकू नये, अफवा पसरवणाऱ्या कुठल्याही पोस्ट टाकू नयेत, समाजात तेढ निर्माण करणारे चित्र अथवा पोस्ट टाकू नये, तसेच चुकीच्या पोस्टला लाइक अथवा शेअर करू नये.

आदेशाची अंमलबजावणी
पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाची भुसावळ विभागात अंमलबजावणी होणार आहे. लवकरच काही व्हॉट्सअॅप ग्रुपची माहिती घेतली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. शहरातील गुन्ह्यांची संख्या घटली आहे. मात्र, अफवांचे पीक जास्त फैलावत आहे. रोहिदासपवार, डीवायएसपी,भुसावळ