आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsaap News In Marathi, Nashik, Election Commission Of India, Divya Marathi

व्हॉट्सअँपवरील प्रचार युर्जसच रोखणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - फेसबुक आणि व्हॉटस अँपवर विनापरवानगी निवडणुकीचा प्रचार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा निर्णय यंदा निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या कामासाठी तांत्रिक कर्मचारीच नसल्यामुळे सोशल मीडियावरचा प्रचार आटोक्यात कसा आणावा, या विचारात प्रशासन असतानाच आता निवडणूक आयोगाचा निर्णय आणि दाखल प्रकरणे यांचा दाखला देत काहींनी संबंधित सोशल मीडियावर तशा पोस्ट करणे सुरू केले आहे. त्यामुळे ‘सुंठीवाचून खोकला जाण्याची.’ सुखद अनुभूती प्रशासनाला येत आहे.


फेसबुक, व्हॉट्सअँप, व्टिटर, टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा निवडणुकीचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या माध्यमांची मोहिनीच भारतीयांना घातली असल्याने त्याचा प्रभावी वापर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन संबंधित माध्यमांवर विनापरवानगी प्रचार करणार्‍यांवर आचारसंहिता भंग केल्याची कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा जाहीर केला आहे. देशात काही निवडक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. नाशिकपुरता विचार करावयाचा झाल्यास येथील निवडणूक शाखेकडे तांत्रिक कर्मचार्‍यांची वानवा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नक्की काय चालू आहे आणि त्यावर नियंत्रण कसे आणता येईल याविषयी ठोस कामगिरी करण्यात संबंधित विभागाला अपयश येत आहे. असे असले तरीही काही सुज्ञ नागरिकांनीच ‘सोशल मीडियावर विनापरवानगी प्रचार करू नये,’ अशा आशयाची मोहीमच हाती घेतली आहे. त्यासाठी फेसबुक व व्हॉट्सअँपवर निवडणूक आयोगाचे परिपत्रक टाकणे, देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांचा दाखला देणे यासारखे प्रकार संबंधितांनी स्वयंप्रेरणेने सुरू केले आहे. त्यामुळे आपसूकच भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रचाराची तीव्रता किंचितशी कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सुखावले आहे.


आयोगाचे परिपत्रक फेसबुकवर
फेसबुक व व्हॉट्सअँपवर निवडणूक आयोगाचे परिपत्रक टाकणे, देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांचा दाखला देणे, यासारखे प्रकार संबंधितांनी स्वयंप्रेरणेने सुरू केले आहेत.