आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who's Young Boys Staying At Near Highway's Would Be Ready For First Aid

हायवेनजीकचे युवक होणार ‘फर्स्‍ट एड’सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील महामार्गांलगतच्या गावांमधील युवक, पोलिस, होमगार्ड्स अशा 20 हजार नागरिकांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रथमोपचाराचे धडे देणार आहे. दरवर्षी होणार्‍या शेकडो अपघातांमध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीची आणि सुयोग्य मदत मिळणे त्यामुळे शक्य होणार आहे. सिंहस्थ काळातही ही पथके उपयुक्त ठरणार आहेत.

महामार्गांलगतच्या अधिकाधिक गावांतील युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असून तिला मंजुरी मिळविण्यासाठी हा प्रस्ताव केंद्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी ) पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर महामार्गांलगतच्या प्रत्येक गावातील काही तरुणांना प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार आहेत. तसेच, इच्छुक पोलिस आणि होमगार्ड्सनादेखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.


कुंभमेळ्यातही लाभ
कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिकला येतात. अशा वेळी अपघातांचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, नाशिक आणि त्र्यंबकला होणारी गर्दी लक्षात घेता अशा ठिकाणी कोणतीही संभाव्य दुर्घटना घडल्यास या प्रशिक्षित युवकांची सेवा उपयुक्त ठरू शकणार आहे.

हे होणार फायदे
अपघातग्रस्त व्यक्तीला वाहनातून बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम कोणते उपचार करावेत, त्याला कशा प्रकारे आडवे झोपवावे, अपघातग्रस्ताला पाणी द्यावे की देऊ नये, भळभळत्या जखमेतून रक्तप्रवाह तात्पुरता कसा थांबवावा यासारख्या प्राथमिक बाबींचे ज्ञान संबंधितांना मिळू शकणार आहे. अपघातग्रस्तांना घटनास्थळीच सुयोग्य प्राथमिक उपचार मिळाले तर रस्ते अपघातात रुग्ण दगावण्याऐवजी जीव वाचण्याच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकणार आहे.