आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारास पत्नीकडून कार्यालयातच मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्हाधिकारी कार्यालयात एका खात्यात तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या पतीस पत्नीसह सासुरवाडीच्या लोकांनी कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २३) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सहसा विविध शासकीय वादात असलेल्या आणि आपल्या विभागातील गंभीर निर्णय घेण्यात आणि न्यायनिवाडा करण्यात व्यस्त असलेले ‘साहेब’ स्वत:च्याच कौटुंबिक प्रकरणात वेगळ्याच परिस्थितीत असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आवारातील इतर शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत असलेल्या तहसीलदारास त्यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी परस्त्रीसोबत प्रत्यक्ष पकडले होते. मात्र ‘ही माझी पत्नी आहे’ असे स्पष्ट उत्तर तहसीलदार महाशयांनी पत्नीस दिले. घडलेल्या या प्रकारानंतर तहसीलदार रात्री घरी आले नाहीत, त्यांचा फोनदेखील बंद होता. त्यामुळे संशय अधिक वाढल्याने सासरकडील आणि माहेरकडील मंडळीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात तहसीलदार हजर झाले नाहीत. फोनवर संपर्क साधला असता ‘कार्यालयात येऊन चर्चा करा’ असे सरकारी उत्तर त्यांनी घरच्या लोकांना दिले.
मात्र कार्यालयात आलेल्या नातेवाइकांशी वाद वाढल्याने पत्नी आणि तिच्या आई-वडील, भाऊ अादींनी मारहाण केल्याची तक्रार तहसीलदार साहेबांनी पोलिसांत दिली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तर, तहसीलदारांनी स्वत:च कागदपत्रे फेकून देत पत्नीसह सासरच्यांवर ‘सरकारी कामात अडथळा आणल्याची’ तक्रार सासरच्या लोकांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. कौटुंबिक वाद असल्याने दोन्ही कुटुंबीयांची बाजू एेकून घेत गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र या पारिवारिक घटनेची चर्चा ‘साहेबांच्या’ कार्यालयाच्या आवारात सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...