आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत दोन लाख लिटर वाइनची विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नावारूपास आलेल्या नाशिक जिल्ह्याच्या वाइनच्या विक्रीत दोन वर्षांत सुमारे 1 लाख 82 हजार 843 लिटरने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्धी आणि प्रचारामुळे वाइन उत्पादनात दरवर्षी सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होणार असून, 2020 पर्यंत साडेतीन कोटी लिटर वाइन उत्पादन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सुमारे 5 हजार टन वाइनच्या द्राक्षांची गरज भासणार असल्याचे फू ड प्रोसेसिंग बोर्डांचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले. नाशिकची ओळख जगभर करून देणारी वाइन इंडस्ट्री भरभराटीस येण्याची चिन्हे दिसत आहे. दरवर्षी वाइन विक्रीमध्ये वाढ होत असल्याने वाइन आणि वाइन द्राक्ष उत्पादक या दोघांना फायदेशीर राहणार आहे.

वाइनची 2010-11 मध्ये (2 लाख 45 हजार 536 लिटर), 2011-12 मध्ये(4 लाख 3 हजार 51 लिटर), 2012-13 (4 लाख 28 हजार 379 लिटर) विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील हवामान हे विविध जातीच्या द्राक्षांसाठी अनुकूल असल्याने वाइन इंडस्ट्रीला येथे मान्यता देण्यात आली. द्राक्ष उत्पादकांसह वाइन उद्योग भरभराटीला यावा, यासाठी वाइनवरील एक्साइज ड्युटी ही 2021 पर्यंत माफ करण्यात आली असून, बियर आणि लिकरवरील कर वाढत असल्याने त्यांच्या दरात वाढ होईल, पर्यांयाने वाइनची किंमत त्यांच्यापेक्षा कमी राहणार आहे.

दहा टक्के वाइनची होतेय निर्यात
भारतातील उत्पादनातून दहा टक्के वाइन ही अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, दुबई, जपान, हॉँगकॉँग,चीन या देशांमध्ये निर्यात होते, तर परदेशातील सुमारे 3 लाख केसेस वाइनची भारतात विक्री होते.

हेक्टर क्षेत्र वाढणार - वाइनची विक्री ज्या प्रमाणात वाढणार आहे, त्याचप्रमाणात वाइनसाठी लागणार्‍या द्राक्षांची विक्री आणि हेक्टरी क्षेत्रदेखील वाढणार आहे. मात्र, यासाठी शेतकर्‍यांनी वायनरीजशी करार करणे योग्य ठरणार आहे. शिवाजी आहेर, अध्यक्ष, अखिल भारतीय वाइन उत्पादक संघ