आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायरमनचा खांबावर विजेच्या धक्क्याने मृत्यू, अचानक वीज सुरू झाल्याने इंदिरानगरात दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरानगर- विद्युत खांबावर दुरुस्ती करताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून महावितरणचे वायरमन समीर वाघ यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का बसल्यानंतर वाघ हे खांबावरच पडून हाेते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात अाले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. 

इंदिरानगरमधील देवदत्त सोसायटीत राहणारे राहुल फडणवीस यांच्या घराची वीजजाेडणी दुरुस्तीसाठी गुरुवारी इंदिरानगर येथील महावितरण कंपनीतील वायरमन समीर बाळकृष्ण वाघ (वय २८, रा. जगतापनगर, उंटवाडी, सिडको) हे खांबावर दुरुस्तीचे काम करताना अचानक महापालिकेच्या पथदीपाच्या तारेत वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा प्रचंड धक्का लागून वाघ विद्युत खांबावरच पडले. ही बाब लक्षात येताच वाघ यांचा सहकारी हेमराज कडेकर यांनी विद्युत खांबावरच प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तेथून जाणारे प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली ॲम्ब्युलन्स बोलावली. श्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांनी वाघ यांना खांबावरून खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी वाघ यांना मृत घोषित केले.

प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे तरुण वायरमन समीर वाघ याचा बळी गेला. समीर तीन महिन्यांपूर्वीच महावितरणच्या सेवेमध्ये कायम झाला हाेता. मालेगाव तालुक्यातील सोयगावचा ताे रहिवासी होता. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 
वायरमन समीर वाघ यांना पाेलवरून खाली अाणताना अग्निशामक दलाचे जवान नागरिक. 

सुरक्षा साहित्याचा वापर करावा 
अनेकवेळा विद्युत खांबांवरील वायरची दुरुस्ती करण्यासाठी जाणारे वायरमन सुरक्षेसाठी कुठलेही साहित्य वापरत नाहीत. यामुळे अनेकजणांना अापले प्राण गमवावे लागले आहे. यासाठी सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करूनच खांबावर किंवा अन्य ठिकाणी जोखमीचे काम करावे, असे महापालिका स्थायी समितीचे सदस्य अॅड. श्याम बडोदे यांनी घटनास्थळी उपस्थित नागरिक अाणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...