आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानाेरे येथे ५० मिनिटांत ९९ मिमी पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ लासलगाव - निफाड तालुक्यातील रुई, धारणगाव, धानोरे, डाेंगरगाव परिसरात बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मका, बाजरी, द्राक्षबागा,सोयाबीन लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. फक्त पन्नास मिनिटात ९९ मि.मी. पाऊस पडल्याची नाेंद वैभव तासकर यांनी शेतात बसविलेल्या पर्जन्य मापकावर झाली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. पावसामुळे या भागातील गावांमध्ये कमी कालावधीत एवढा पाऊस कधीही पाहिला नसल्याचे धानाेरे येथील साेसायटीचे अध्यक्ष मच्छींद्र गुजर यांनी सांगितले. धानोरे येथील तीन बंधारे फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या माेठे प्रचंड नुकसान झाले आहे. लासलगाव येथून कानळद येथे जाणारी एसटी रुई-देवगावच्यामध्ये असणाऱ्या सातमोरी भागात अडकून पडली होती. या बसमधील १० ते १५ प्रवाशांची सुटका रुई येथील ग्रामस्थांनी केली. सर्वात जास्त नुकसान धानाेरे या गावातील शेतकऱ्यांचे झाले. यात टाेमॅटाेचे १५० एकर, बाजरीचे २०० एकर, मक्याचे ४५० एकर, द्राक्षाचे २०० क्षेत्राचे नुकसान झाले. याचबराेबर परिसरातील साेमनाथ खडांगळे यांच्या डाळिंब बागेचे नुकसान झाले. सुरेश तासकर, निवृत्ती तासकर, राजाराम तासकर यांचेही नुकसान झाले. अनेकांच्या शेतातील कांद्याची राेपे वाहून गेली. रुई येथील अादिवासी वस्तीत पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.

विद्यार्थी वाचविला
रुईयेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणारा संदीप यादव वाघ हा विद्यार्थी सायकलने घरी धानाेरे येथे येत असताना एका माेठ्या नाल्याच्या पुरात अडकला. याची माहिती मिळतात विष्णू सालमुठे (रा. वाकद) या युवकाने जीवाची पर्वा करता कमरेला दाेर बांधून त्या विद्यार्थ्यास माेठ्या शिताफीने पाण्याच्या प्रवाहातून वाचविले. सायकल शाळेचे दप्तर मात्र वाहून गेले. त्यास भाऊसाहेब गुजर, रामदास गुजर, जालिंदर गुजर, गाेपीनाथ गुजर, अनिल खडांगळे यांनी मदत केली.

पिकांचे तातडीने पंचनाम्याची मागणी
एकीकडे कांदा भावाने शेतकरी सुलतानी संकटात सापडलेले असताना या अस्मानी संकटाने शेतकरी अार्थिक संकटात सापडला अाहे. नुकसानींचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी वैभव तासकर, मच्छींद्र गुजर, साेमनाथ खडांगळे यांनी केली.

धानाेरे (ता. निफाड) येथे बुधवारी मुसळधार पावसाने द्राक्षबागेतून पाण्याचे असे लाेंढे वाहत हाेते. रुई येथील घरेही पाण्याखाली गेली हाेती.
बातम्या आणखी आहेत...