आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Five Days Results Of Engineering And Degree Vice Chancellor Gadea

पदवी व अभियांत्रिकीचे निकाल पाच दिवसांत- कुलगुरू गाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र आणखी सक्षम व्हावे, या उद्देशाने 28 मार्च रोजी विद्यार्थी कल्याण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी मंगळवारी येथे केली. याचबरोबर येत्या पाच दिवसांत बी.एस्सी.पासून अभियांत्रिकी या परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. नाशिक भेटीवर आलेल्या गाडे यांनी पुढे सांगितले की, मॅन्युअल बारकोडिंग सिस्टिममुळे निकालास विलंब होत आहे. नाशिकमध्ये सुरू होणार्‍या या विद्यार्थी कल्याण केंद्रामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी निगडित प्रत्येक गोष्ट या केंद्रावर उपलब्ध होणार आहे.
आर्थिक तसेच सामाजिक दुर्बल घटकांतील पदवीच्या विद्यार्थ्यांना 1800 रुपये, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 2400 रुपयांची राजर्षी शाहू महाराज व गुणवंत विद्यार्थी अशी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ तब्बल 30 विद्यार्थ्यांना होणार असून, त्याकरिता सहा कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे. तर पुणे विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थिनींसाठी 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विद्यार्थिनींचे शिक्षण, हेल्थ चेकअप, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी काळजी घेतली जाणार आहे.
निवडणुकांचा परिणाम निकालांवर नाही
येणार्‍या निवडणुकांचा परीक्षांच्या वेळापत्रकावर व परीक्षांच्या निकालांवर परिणाम होणार नसल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या परीक्षा आणि निकालांच्या तारखांत बदल होणार नाही.
विद्यापीठ कामकाजाचे होणार ऑटोमेशन
पुणे विद्यापीठाचे 60 टक्के कामकाज ऑटोमेशन प्रक्रियेने करण्याची योजना पूर्ण झाली असून, येत्या वर्षात विद्यापीठाचे शंभर टक्के कामकाज या पद्धतीनेच होणार आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल निश्चित करण्यात आले असून, त्यात उत्तरपत्रिका संगणकाद्वारे तपासल्या जाणार आहेत. मात्र, सिस्टिम ट्रान्सप्लान्ट होत असताना वेळ जातो. नवीन पद्धती अवलंबताना अडचणी येत असल्याने या प्रक्रियेला वेळ लागतो, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.
परीक्षा विभाग नियंत्रकांना हटविण्याची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक संपदा जोशी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी या वेळी कुलगुरूंकडे केली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार भोंगळ असल्याने ही मागणी करण्यात आली. या वेळी मनविसेने कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. या वेळी मनविसेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे, जय कोतवाल, अजिंक्य गिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.