नाशिक - शासकीय निरीक्षण गृहातून पीडित महिला पळून जाण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. शासनाकडून निरीक्षणगृहांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जात नसल्याने पलायनाचे प्रकार वाढले आहेत. एक वर्षात २४ महिलांनी पलायन केले असून, त्यांचा तपास अजून लागलेला नाही.
निराधार, अबला, विधवा परितक्त्या महिलांसाठी ‘वास्तल्य’ निराधारगृह सुरू केले आहे. येथे अत्याचारग्रस्त आणि कुंटणखान्यातून सुटका केलेल्या, पोलिसांनी पकडलेल्या महिलांना आसरा दिला जातो. वात्सल्यमध्ये कुमारी मातांची संख्या अधिक असते. २०१४ मध्ये ठाणे येथील ३७ बारबालांना वात्सल्यमध्ये ठेवले होते. यातील २१ बारबालांनी सुरक्षा रक्षकाच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. यातील चार मुलींना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, पळून गेलेल्या अन्य मुलींचा शोध लागलेला नाही.
२०१५ मध्ये महिला पळून गेल्याची नोंद पोलिसांत आहे. शासकीय पाहरेकर्यांची संख्या प्रवेशित महिलांच्या तुलनेत कमी असल्याने महिलांनी समूहाने नियोजनबद्ध पलायन केले असल्याचे महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. वास्तविक महिलागृहामधील असुविधा आणि गैरप्रकारांमुळे महिला येथून निघून जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची नोंद आहे. यातील काही शहरात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यातून गैरप्रकार उघड होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सुरक्षाव्यवस्था पुरेशी नाही
महिलांसाठी निरीक्षणगृह असलेल्या वात्सल्य या संस्थेमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरेशी नाही. अवघे एक दोन पहारेकरी पळून जाणार्या महिलांना रोखू शकत नाही. येथील सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. नलिनी पाटील, परिविक्षाधीन अधिकारी, वात्सल्य