आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माॅर्निंग वाॅकला निघालेली महिला ट्रकच्या धडकेने ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिंगरोडवरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने मॉर्निंग वॉकला निघालेल्या दांपत्याला धडक दिल्याने यातील महिला जागीच ठार झाली. शनिवारी सकाळी वाजता हिरावाडी पुलाजवळील गुंजाळबाबानगर येथे हा अपघात घडला. या रस्त्यावर हाेणारे वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सभापतींसह नागरिकांनी लिंकरोडवर रास्ता रोको केला. या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने अपघातात वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गंगामाई भाजीबाजार समितीचे अध्यक्ष शांताराम क्षीरसागर हे पत्नी आशा क्षीरसागर यांच्यासमवेत तारवालानगर येथील लिंकरोडवर शनिवारी सकाळी फिरायला निघाले असता, तारवालानगरकडून वेगात जाणाऱ्या ट्रकने (एमएच १५, ४८४३) क्षीरसागर दांपत्याला धडक दिली. या अपघातात आशा क्षीरसागर या जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह प्रभाग सभापती सुनीता शिंदे यांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. सकाळी महापालिकेचे शहर अभियंता सुनील खुने यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तत्काळ सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे अाश्वासन दिले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहस्थकाळात वाहतूक वळवण्यासाठी लाखोंचा खर्च करून हा लिंकरोड बनविण्यात आला आहे. या लिंकरोडवर सुरक्षेच्या काहीच उपाययोजना नसल्याने अपघात घडत आहेत. परिसरातील पप्पू माने, बाळू बडवे, राजू जेऊघाले यांच्यासह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. नगरसेवक रुची कुंभारकर यांनी लिंकरोडवर गतिरोधक, दुभाजक आणि पांढरे पट्टे मारण्यासाठी पालिका प्रशासनास निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने अपघातात वाढ होत आहे.

नागरिकांसाठी धोकेदायक रस्ता
पादचाऱ्यांसह लहान वाहनांसाठी तारवालानगर परिसरातील हा रस्ता धोकेदायक ठरत अाहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक आणि दुभाजक टाकण्यात यावेत. रुची कुंभारकर, नगरसेवक,प्रभाग

प्रशासनाकडून उपाययाेजना नाही
या रस्त्यावरवाहतूक सुरक्षेसाठीचे नियोजन केल्याने नागरिकांचे बळी जात आहेत. गतिरोधकासह सूचनाफलक लावण्यासाठी निवेदन दिले आहे. रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. सुनीता शिंदे, सभापती,पंचवटी प्रभाग

गतिराेधकाची मागणी
तारवालानगर ते अमृतधाम महामार्ग चौफुली या लिंकरोडवर लामखेडे मळा, शिवनगर, तलाठी कॉलनी, गुंजाळबाबानगर, मंडलिकनगर, शिवकृपानगर, अंबाजीनगर, सिद्धिविनायकनगर, साईनगर हा परिसर आहे. या ठिकाणी गतिरोधक अथवा दुभाजक टाकले नसल्याने पायी रस्ता ओलांडणे नागरिकांना धोक्याचे झाले आहे. प्रशासनाने वस्तीच्या ठिकाणी पांढरे पट्टे, सूचनाफलक आणि वेगमर्यादाचे फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केलेल्या रास्ता राेकाे अांदाेलनात सहभागी प्रभाग सभापती सुनीता शिंदे नगरसेवक रुची कुंभारकर. इन्सेटमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अाशा क्षीरसागर.