आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् सरसावल्या रणरागिणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रीती जाधव या युवतीने केलेल्या आत्महत्येबाबत पोलिसांना जाब विचारत शहरातील विविध महिला संघटनांनी मुलींपुढे सहकार्याचा हात केला. एकप्रकारे मुलींच्या रक्षणासाठी शहरातील महिला संघटनांच्या रणरागिणीच मैदानात उतरल्याचे चित्र गुरुवारी दिसले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने मुलींसाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला.

सातपूरमधील जाधव संकुल येथे राहणार्‍या प्रीती जाधव या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून बुधवारी आत्महत्या केली. या घटनेमुळे महिला संघटना जागृत झाल्या. केवळ मदत करण्याचे आश्वासन न देता या संघटनांच्या नेत्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांकही वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करून आपण मदतीसाठी केव्हाही उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. मुलींनी निर्भयपणे अशा प्रसंगांना सामोरे जात अशा प्रकारांबाबत प्रथम पालकांना कल्पना द्यावी तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती वाटत असल्यास आमच्याकडे संपर्क साधावा, तत्काळ मदत केली जाईल, असे आवाहनही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने तसेच मनसे महिला आघाडी, भाजप, जनवादी महिला संघटना आदींनी केले आहे.

धोकादायक स्थळांचा आराखडा देणार : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा अमृता पवार यांनी कार्यकर्त्यांसह सातपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल पोवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. शहरातील धोकादायक जागांवर पोलिसांची गस्त वाढविण्याची विनंती त्यांनी केली. अशा जागांचा आराखडाच पवार आता पोलिसांना पुरविणार आहेत. अमृता पवार यांनी पोवार यांना घडलेल्या आत्महत्येचा तपास कुठपर्यंत आला आहे, याबाबत विचारणा केली.

मनसेतर्फे निवेदन : या वेळी नगरसेविका उषा शेळके, सुरेखा नागरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह येऊन पोलिसांना या प्रकरणी दिलेल्या निवेदानात रोडरोमिओंचाही बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

अगदी साधी सरळ होती माझी पोरगी..
‘गळफास लावून गेली पोरगी.लई साधी सरळ होती हो.तिला एवढंसं बोट लावलेलंही सहन व्हायचं नाही.’ प्रीतीची आई सांगत होती आणि ऐकणार्‍यांचे डोळे पाणावत होते. खोलीतच मागे बसलेल्या आजी पदराने डोळे पुसत होत्या.

सातपूरमधील जाधव संकुलातील प्रीती जाधवने बुधवारी सकाळी गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर भेटायला येणार्‍या प्रत्येकाला तिची आई आणि थोरली बहीण ही विषण्णता सांगत होती आणि प्रत्येक जण सुन्न होऊन बाहेर पडत होता. सामनगाव येथील अभियांत्रिकीत शिकणारा प्रीतीचा धाकटा भाऊ शूटिंग करणार्‍यांवर चिडत होता. बहिणीच्या मृत्यूचा राग त्यातून व्यक्त होत होता. आर्शमशाळेत शिक्षिका असलेली थोरली बहीण स्वाती अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. प्रीती रोज शेजारी चावी ठेवून कॉलेजला जायची; पण त्या दिवशी तिनं चावीच ठेवली नाही. वडील घरी आले तेव्हा प्रीती दारच उघडेना. शेवटी मागून उडी मारून घरात येताच प्रीतीने स्वत:चा जीव घेतल्याचं वडिलांना दिसलं आणि.आई पुन्हा धीर खचून शांत बसून राहिली. घरात सुन्न वातावरण आहे. परिसरातले नागरिकही या घटनेमुळे वैतागल्याचे जाणवत होते.