आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Who Searching Rare Botany Species In Nashik

नाशिकमधील दुर्मिळ वृक्षवल्ली शोधती सोयरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्राचीन दंडकारण्याची साक्ष घेऊन उभी असलेली अत्यंत दुर्मिळ अशी वृक्षराजी नाशिकनगरीची शान असून, चहुबाजूने विस्तारत चाललेल्या या शहरात आजही 40 ते 50 अत्यंत दुर्मिळ वृक्ष ठिकठिकाणी आढळतात. अशा वृक्षांची संख्या नगण्य असली तरी या वृक्षांची महती आणि माहिती जाणणारे शाबूत आहेत. केवळ त्या परिसरातील नागरिकांना या दुर्मिळ वृक्षांबाबत फारशी माहिती नसल्याने त्यांचे पर्यावरणीय व वैद्यकीयदृष्ट्या महत्त्व आजच्या पर्यावरणदिनी कळावे, हा हेतू आहे..
ब्राझील, दक्षिण अमेरिका, पूर्व व उत्तर भारत, आफ्रिका या देशांतील झाडे नाशिकमध्ये आपली मुळे रोवून आहेत. त्यांचे संवर्धन व संख्या वाढविण्यासाठीची लागवड नागरिकांकडून केली जात नाही व पर्यायाने शहरामध्ये अशी विविध प्रकारांचे एक वा दोनच झाडे आढळतात.

गंगापूररोडलगतच्या नरसिंहनगर येथील शनि मंदिर परिसरामध्ये ‘नेवर’ हा वृक्ष आढळतो. शहरात हा एकमेव वृक्ष आहे. सततच्या वाहनांच्या धुरामुळे हे झाड काळवंडून गेले आहे. या झाडाच्या बियांचा लेप लहान मुलांच्या छातीवर लावल्यास सर्दी कमी होते, असे जाणकार सांगतात. या झाडाची फुले फक्त रात्री उमलतात व ती अत्यंत सुगंधी असतात. एकमेव वृक्ष असल्याने या वृक्षाचे संवर्धन करणे आवश्यक झाले आहे. याचबरोबर तीन-चार मजली इमारतीएवढे उंच असलेला गोरख चिंच हे झाड तर नाशिकची शान मानले जाते. देवळाली कॅम्प येथे शेजारी-शेजारी सख्ख्या भावांसारखी या गोरख-चिंचची दोन झाडे उभी आहेत. या झाडाचे मूळ आफ्रिका असून, पर्यावरण संतुलन राखण्यात या झाडाचा मोठा वाटा आहे.
एकमेव वृक्ष : -गुलाबी टाबेनुया : सूर हॉटेलजवळ : गंगापूररोड
या वृक्षास गुलाबी रंगांची फुले येतात. मार्च-एप्रिल हा या वृक्षाचा बहराचा काळ असतो. हा वृक्ष मुळचा दक्षिण अमेरिकेतील असून, विशेषत: ब्राझील प्रांतात आढळतो.

मणिमोहोर वृक्ष : कलंत्री मंगल कार्यालयाजवळ, नाशिकरोड :साधारणत: सप्टेंबर महिना हा या वृक्षाचा बहराचा काळ असतो. या वृक्षाला लाल रंगांची फुले गुच्छागुच्छाने बहरतात.
कैलासपती वृक्ष : नाशिकरोड येथील आर्चिज गॅलरीजवळ. : याचे फुल अत्यंत आकर्षक असते असे नव्हे तर ही फुले वैद्यकीयदृष्ट्या सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. याच्या पानांचाही औषधासाठी उपयोग होतो. विशेषत: सर्दी, पोटदुखी आणि हायपरटेन्शनमध्ये हा वृक्ष उपयोगी ठरतो.
मारखामिया वृक्ष : लायन्स क्लब परिसर, शरणपूर रोड, : पिवळसर रंगाची व तुतारीसारख्या फुलांच्या गटात मोडणारी फुले या वृक्षास येतात.
एकमेव वृक्ष :
गुलाबी टाबेनुया : सूर हॉटेलजवळ : गंगापूररोड
मणिमोहोर वृक्ष : कलंत्री मंगल कार्यालयाजवळ, नाशिकरोड
कैलासपती वृक्ष : नाशिकरोड, आर्चिज गॅलरीजवळ
मारखामिया वृक्ष : लायन्स क्लब परिसर, शरणपूररोड
रक्तचंदन वृक्ष : नेहरू उद्यान
केवळ 2-3 संख्या असलेले वृक्ष
बहावा : गंगापूररोड व इंदिरानगर परिसर
जंगली बदाम : एचपीटी महाविद्यालय
सीता अशोक : गोळे कॉलनी, गंगापूररोड परिसर
रोहितक : नाशिकरोड परिसर
धावडा : नाशिकरोड, नेहरू उद्यान
टेटू : एचपीटी महाविद्यालय, गोदा पार्क मुख्य प्रवेशद्वाराजवळ
गुलाबी कॅशिया : कॅनडा कॉर्नर परिसर
झाडांचे संवर्धन करणे आवश्यक
अशा झाडांची एकत्रित माहिती आणि संकलन करून त्यावर संशोधन करण्याचा आमचा प्रयत्न होता. या संशोधनाच्या निमित्ताने शहरामध्ये संख्येने दुर्मिळ असलेले अनेक अनमोल वृक्ष आहेत, ज्यांची माहिती त्या परिसरातील नागरिकांना नसल्याने त्यांचे महत्त्वही त्यांना कळत नाही, असे लक्षात आले. अशा झाडांचे संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. - प्रा. एस. जी. औटी, वनस्पतिशास्त्र विभाग, एचपीटी महाविद्यालय