आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ची निवडणूक: 37 नवोदित, 17 विद्यमान, 6 माजी नगरसेविका विजयी; भाजपच्या 49% महिला यशस्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिकसाठी ३७ नवख्या महिलांना नाशिककरांनी पसंती दिली आहे, तर १७ विद्यमान नगरसेविकांवर विश्वास दाखविला आहे. तसेच, १६ पैकी माजी नगरसेविकांना पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. 
 
या निवडणुकीत एकूण ३८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी ३५ विद्यमान नगरसेविकांनी नाशिककरांकडून पुन्हा कौल मागितला होता. त्यापैकी १७ नगरसेविकांवर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखविला, तर १८ नगरसेविकांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, यावेळी १६ माजी नगरसेविकांनीही निवडणूक लढविली. त्यापैकी फक्त सहा जणी विजयी झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे ३७ नवख्या महिलांना नगरसेविका म्हणून काम करण्याची नाशिककरांनी संधी दिली आहे. 

भाजपच्या सर्वात जास्त म्हणजे ३२ नगरसेविका या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. भाजपने ६५ महिला उमेदवार दिल्या होत्या. त्यापैकी ३२ म्हणजे ४९ टक्के महिला उमेदवारांनी बाजी मारली. त्या खालोखाल शिवसेनेने ६३ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या १५ म्हणजे २३ टक्के उमेदवार विजयी झाल्या. त्याखालोखाल काँग्रेसच्या २२ पैकी (१३%), राष्ट्रवादीच्या २९ पैकी (१०%) तर मनसेच्या अवघ्या म्हणजे ४% महिला विजयी झाल्या. विशेष म्हणजे, शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बबन घोलप आणि देवळाली मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप यांच्या दोन्ही बहिणी माजी महापौर नयना घोलप आणि तनुजा घोलप या दोघींना नाशिककरांनी नाकारले. 
 
मागील पंचवार्षिकात सर्वाधिक महिला निवडून आणणाऱ्या मनसेची यावेळी सुरेखा भोसले आणि नंदिनी बोडके या दोघींनी खाती खोलली. प्रभाग १० मधील मनसेच्या कलावती सांगळे यांचा अवघ्या ११ मतांनी पराभव झाला. माकपच्या वसुधा कराड, बसपच्या सुजाता काळे, ज्योती शिंदे, काँग्रेसच्या अश्विनी बोरस्ते आदींना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बसपच्या माजी नगरसेविका सुजाता काळे यांनी महिला खुल्या गटातून निवडणूक लढवून शिवसेनेच्या सीमा निगळ यांना कडवी झुंज दिली. मात्र अवघ्या ४२८ मतांनी त्यांचा पराभव झाला. 
 
प्रभाग १२ मध्ये काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या माजी विरोधी पक्ष नेत्या डॉ हेमलता पाटील यांच्यात आणि भाजपच्या नवोदित उमेदवार प्रेरणा बेळे यांच्यात अटीतटीचा सामना झाला. यात डॉ. पाटील यांनी ४९९ मतांच्या आघाडीने बेळेंवर मात केली. विद्यमान १७ नगरसेविकांना नाशिककरांनी पुन्हा संधी दिली तर माजी नगरसेविकांना स्वीकारले. उलट विद्यमान १५ नगरसेविकांना घरी पाठविले तर माजी नगरसेविकांना पुन्हा नाकारले. 

विजयी महिलांची टक्केवारी 
भाजप : ४९% 
शिवसेना : २३% 
काँग्रेस : १३% 
राष्ट्रवादी : १०% 
मनसे : ५% 
 
अशा लढती 
१७ विद्यमान नगरसेविकांना पुन्हा संधी 
१५ नगरसेविकांना नाकारले 
१० माजी नगरसेविकांना पुन्हा नकार 
०६ माजी नगरसेविकांना स्वीकारले 
बातम्या आणखी आहेत...