आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानावेळी महिलांनी केले यशस्वी व्यवस्थापन, राजकीय मदतनिसासह पार पाडली प्रशासकीय जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरामध्ये सर्वत्र मतदानाची धावपळ सुरू असताना या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांसह पूर्णवेळ काम करणाऱ्या महिला अग्रस्थानी होत्या. अगदी सकाळी ७ वाजेपासूनच बूथवर महिला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. नाशिकमध्ये महिला मतदारांचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त असल्याने अनेकांनी बूथवरील सुव्यवस्थेसाठीही महिलांकडे सूत्रे सोपवणे सोयीचे मानले. 
 
रणरणत्या उन्हामध्ये काही ठिकाणी आपल्या लहान मुलांना सावलीत बसवून या महिला राबताना दिसल्या. एरवी घर आणि काम यांचा समतोल साधणाऱ्या या महिला कार्यकर्त्या इथेही तीच कसरत यशस्वीरीत्या करीत होत्या.
 
मतदानासाठी लोकांची सकाळपासूनच गर्दी होती. प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी बूथवरील महिला संवाद साधत होत्या. सकाळपासून मतदार याद्यांमध्ये नावे शोधण्यापासून मतदारांना बूथपर्यंत आणण्याची अनेक कामे महिला कार्यकर्त्या करत होत्या. अनेक पुरुष उमेदवारांसाठीही महिला काम करताना दिसल्या. बूथवर मात्र महिला आणि पुरुष असे विभाजन नव्हते. 
 
सगळ्या याद्यांमध्ये नाव शोधण्यासाठी महिलाच काम करत होत्या. प्रत्येक उमेदवारासाठी साधारण ४० महिला विविध बूथवर कार्यरत होत्या. त्यांना दिवसभराचे नियोजन विचारले असता त्यांनी सांगितले की, सकाळी लवकर घरातली कामे उरकून सगळ्या जणी उमेदवारांच्या अगोदर बूथवर येऊन तयार होत्या. सायंकाळी मतदान संपेपर्यंत या महिला बूथवर होत्या.
 
प्रशासकीय पातळीवरील निवडणूक प्रक्रियेतही अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळा शिक्षिका, कनिष्ठ व  वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापिका यांच्याशिवाय प्रशासकीय सेवेतील महिला, पोलिस महिला यांचा माेठा  सहभाग दिसून आला. प्रत्येक मतदान केंद्रावर महिला पोलिस रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध स्त्रियांना पुढे जागा करून देणे, महिलांना बसण्यासाठी जागा, पाण्याची सोय अशाप्रकारे कार्यरत होत्या. एकूणच, मतदानाच्या दिवशी महिलांनी राजकीय मदतनीस आणि प्रशासकांची भूमिका निभावली.
 
 
बातम्या आणखी आहेत...