आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकात महिला सुरक्षेसाठी पथके; छेड काढणार्‍यांना मिळणार जागेवरच प्रसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गणेशोत्सवात होणार्‍या भाविकांच्या गर्दीत महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सरसावली आहे. यासाठी स्वतंत्र दहा पोलिस कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात महिला अधिकारी-कर्मचार्‍यांसह गुन्हा शोध पथकातील कर्मचार्‍यांचा साध्या वेशात समावेश राहणार आहे.

यंदाही पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात महिला सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आरास बघण्यासाठी होणार्‍या गर्दीचा फायदा घेत टवाळखोरांकडून छेडछाडीचे तसेच इतर गैरप्रकार घडतात. यासाठी दोन महिला आणि तीन पुरुष कर्मचारी अशा पाच कर्मचार्‍यांचे पथक गर्दीच्या ठिकाणी कार्यरत राहील. छेडछाड करणार्‍यांना रंगेहात पकडून जागेवरच प्रसाद देण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, साहेबराव पाटील यांच्या सूचनांनुसार पथके काम करतील.

महिला हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ
डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या महिला हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत 164 तक्रारी प्राप्त झाल्या. सर्वाधिक तक्रारी घरगुती वाद, मद्यपी नवर्‍याकडून मारहाण, सासूचा जाच या आहेत. मुलींना मिसकॉल येणे, अश्लील एसएमएस व छेडछाडीच्या तक्रारींचाही समावेश आहे. या तक्रारी संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना कळवून तातडीने निकाली काढल्या जातात. यात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई होते, असे कक्षातील महिला कर्मचार्‍यांनी सांगितले.

नियंत्रण कक्षाकडे तक्रार द्यावी
स्वतंत्र गस्तपथकही कार्यरत राहणार असून, कुठेही छेडछाड अथवा टवाळखोरांचा धिंगाणा सुरू असल्यास नियंत्रण कक्षात 2305233 अथवा 9762100100, 9762200200 या क्रमांकावर संपर्क साधावा. गेल्या वर्षी गस्त पथकांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यात यश आले होते.
-पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हा शाखा