आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकले घर, चुकले दार; पण मानली नाही हार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नकळत्या वयात चूक झाल्याने आपल्याच माणसांनी झिडकारले.. त्यातून सावरण्यासही वेळ मिळाला नाही. रक्ताच्या नात्याला कायमचे मुकलेल्या ‘त्या’ तिघींनी मग एकमेकींनाच जिवाभावाचे मानत अपत्यांना वाढवले, तेही समाजाला आदर्शभूत ठरावे, अशा पद्धतीने.

लहानपणी ‘एकही भूल’ झाली आणि त्या चुकीने आयुष्यच बदलून टाकले. 15 वर्षांपूर्वी नाशिकच्या वासल्य निराधार आर्शमामध्ये या तीन तरुणी दाखल झाल्या. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील या तरुणींवर नकळत्या वयातच आई होण्याची वेळ आली. त्यांनी केलेले हे कृत्य समाजासाठी पापच होते. तथाकथित इभ्रत जाण्याच्या भीतीने रक्ताच्या नात्यानेदेखील घराबाहेरचा मार्ग दाखवला, स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्यासारख्या दुर्दैवी महिलांसाठी शासनाने वात्सल्य महिला निराधार वसतिगृह सुरू केले असल्याची माहिती मिळाल्याने त्या येथे आल्या. वसतिगृहातच तिघींची ओळख झाली. एकमेकींच्या दु:खात सहभागी होत ‘हेच आपले घर’ असे मानून त्यांनी अपत्यांना जन्म दिला. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या, त्यानेच धोका दिला. दुसर्‍याबरोबर लग्न केले तर तो धोका देणार नाही, याची काय 6खात्री, या विचाराने पुन्हा लग्नाचा विषयदेखील डोक्यात आणला नाही.

शहरात राहून आपली मुले आयुष्यात यशस्वी झाल्याचे स्वप्न त्या पाहत असून त्या दृष्टीने त्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. एकीचा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला, तर दुसरीची मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे. तिसरीची मुलगी दुसरीमध्ये शिकतेय. एकत्र राहत असल्याने तिघींसह मुलांनादेखील पोरके आणि निराधार असल्याची जाणीवही होत नाही.

पाजले शिक्षणाचे बाळकडू
या मुलींनी स्वत: चांगले शिक्षण घेऊन नंतर मुलांनाही शिक्षणाचे बाळकडू पाजत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या मुलांसाठी त्यांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या आहेत, त्याला तोड नाही. एन. एम. देशमाने, निदेशिका, वात्सल्य वसतिगृह