Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Work Jam Due To Strike Of Revenue Staff

महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद अांदाेलनामुळे कामकाज ठप्प

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 09:01 AM IST

  • महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद अांदाेलनामुळे कामकाज ठप्प
नाशिक-पुरवठा विभागातील निरीक्षकपद सरळसेवेने भरू नये, महसूल लिपिकास महसूल सहायक पदनाम करावे यासह विविध १० प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेधही केला. दुसरीकडे कार्यालये ओस पडल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली.

पुरवठा निरीक्षकाची ५० टक्के पदे सरळसेवेने भरल्याने लिपिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे हा आदेश त्वरित रद्द करण्यासाठी तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या २०१२ पासून विविध मागण्या प्रलंबित आहे. २०१५ मध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु, त्याचे शासन आदेश किंवा परिपत्रकच अद्याप काढण्यात आलेले नाही. त्यामुळे केवळ तोंडी अाश्वासनांची खैरात शासनाने देत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. त्याचा जाहीर निषेध करत मंगळवारी महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर तीव्र निदर्शने केली. त्यामुळे ऐन आठवड्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच काम करणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. परंतु, शासनाला त्याची कुठलीही काळजी नसल्यानेच कर्मचाऱ्यांनी १० दिवसांपूर्वीच इशारा देऊनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पुरवठा कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तलाठ्यांनीही सातबारासह संगणकीय कामास विरोध करत त्यावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे सध्या महसूल विभागाचे संपूर्ण कामकाज ठप्प असूनही शासनाला त्याचे कुठलेही सोयरसूतक नाही. जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत असून कामेही आता रखडली आहे. दुसरीकडे संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन माघारी घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

कर्मचाऱ्यांअभावी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये सामसूम दिसून येत होती. दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संप हा बेकायदेशीर असल्याचे भासवित शासनाने कर्मचाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा काढण्याची तयारी सुरू केली अाहे. सरकारची ही भूमिका म्हणजे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

वाहनचालकही झाले आंदोलनात सहभागी
कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील ४१ वाहनचालकही सहभागी झाले आहे. शिपाई दर्जाचे १८३ तर लिपिक टंकलेखक दर्जाचे ३४३ तसेच अव्वल कारकून २५३ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. पदाेन्नतीने नायब तहसीलदार झालेल्या २४ नायब तहसीलदारांनीही आंदोलनास पाठिंबा देत सहभाग नोंदविला.

Next Article

Recommended