नाशिक - जगातला प्रत्येक देश हा कष्टकरी वर्गाने घडवलेला आहे. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांनीच देश टिकवला आहे. देश फोडण्याचे आणि विकण्याचे काम वरच्या वर्गातल्या लोकांनी केले. हे अगदी खरे आहे की, ब्राह्मण आणि क्षत्रियांनी देश विकला. असे परखड मत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले आहे.
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नाशकात अायाेजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संमेलनाच्या समाराेपप्रसंगी ते बोलत होते. हा समारोप कार्यक्रम रविवारी दि.(४) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. डाॅ. कसबे यांच्या सांगण्याप्रमाणे वरिष्ठ वर्गांनी कधीच समाजातील सामान्य घटकांना पुढे जाऊ दिले नाही. खरा देश घडवणारे, देश बुलंद करणारे दलित मागे पडले. त्यामध्ये स्त्रियांनादेखील शूद्राती शूद्र मानले गेले. भगवतगीतेमध्ये तसा उल्लेखही करण्यात आला की, हा वर्ग पापयोनी आहे. असे असताना तरुणांनी आंबेडकरांचे विचार बुद्धीवादी, सद्सदविवेक बुद्धीचा पुरस्कार करणारे होते. हे लक्षात घेऊन तळागाळातल्या लोकांपर्यंत विचारी वागण्याची शिकवण पोहचली पाहिजे. आता दिवस बदलले आहेत, विचारांचा उपयोग बौद्धिक वाढ होण्यासाठी करून घ्यायला हवा. असेही त्यांनी सांगिलते.
उत्तम कांबळे म्हणाले, नव्या पिढीने सत्ताकारणाचे डावपेच समजून घ्यावेत. मागच्या पिढीने महापुरुषांमध्ये झुंजी लावल्या, ते एकमेकांचे विरोधक नव्हते. या झुंजी लावण्यात एक पिढी खराब झाली. आंबेडकरांना देवघरात बसवू नका, अवतार निर्जीव असतात. विचार ज्वलंत असतात. आंबेडकरांना आचरणात आणा. हक्क हे मिळवावे लागतात, मागून मिळत नाही ही शिकवण त्यांनी दिली. ती लक्षात ठेवून त्या प्रमाणे काम करायला शिका असे प्रतिपादन केले.
याच कार्यक्रमामध्ये आंबेडकरांचा अभ्यास आणि विद्याग्रहण करण्याची अभ्यासू वृत्ती या विषयावर प्रा.डॉ. दिलीप धोंडगे यांनी मत व्यक्त केले. याशिवाय डॉ. गोपाळ गुरु यांनी बाबासाहेबांचे राष्ट्रीय एकात्मतेविषयी विचार, डॉ. चैत्रा रेडकर यांनी बाबासाहेबांचे विचार आणि विद्यमान स्थिती, डॉ. विजय खरे यांनी बाबासाहेबांचे परराष्ट्र धोरण आणि विद्यमान स्थिती या विषयावर मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. भालचंद्र कानगो, डॉ. मनीषा जगताप, डॉ.दिलीप धोंडगे, श्रीपाद जोशी, डॉ. विशाल जाधव अादी उपस्थित होते.