आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड हेरिटेज डे विशेष : विविध पुरातनमूर्तींचे संग्राहक : जेष्ठारामभाई बटाविया...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील पुरातनवस्तूसंग्राहकांपैकी एक ज्येष्ठ संग्राहक म्हणून नावलाैकिक असलेले जेष्ठारामभाई बटाविया हे वयाच्या ८१व्या वर्षीदेखील पुरातन मूर्ती/वस्तूंचा संग्रह करतात. एवढेच नव्हे तर त्या वस्तू/मूर्तींचा बारकाईने अभ्यासदेखील अावडीने करतात. अाज (दि. १८) ‘वर्ल्ड हेरिटेज डे’च्या निमित्ताने त्यांच्या या छंदावर टाकलेला हा प्रकाश... 
 
सकल देवतांचा सूक्ष्मरूपाने नाशिकक्षेत्री अधिवास असल्याने पुराणांत या नगरीचा पुण्यभूमी/तपोभूमी म्हणून उल्लेख आला आहे. या देवता स्थूलरूपाने मंदिरात, जुन्यावाड्यातील देवघरात त्याबरोबर पुरातनवस्तू संग्रहालय आणि संग्राहक यांच्या प्रदर्शिकांमध्ये विराजमान आहेत. मूर्तींवर त्या-त्या कालखंडाचा प्रभाव प्रकर्षाने दिसतो. देव्हाऱ्यातील मूर्ती धर्मशास्त्रदृष्ट्या पुजेस अपात्र झाल्यावर ती वस्तुसंग्रहालयात अथवा वस्तूसंग्राहकांकडे येते. नाशिकमधील पुरातनवस्तूसंग्राहकांपैकी एक ज्येष्ठ संग्राहक आहेत, जेष्ठारामभाई बटाविया. आज वयाच्या ८१ व्या वर्षीही तितक्याच दांडग्या उत्साहाने ते पुरातन मूर्ती/वस्तूंवर भरभरून बोलत असतात. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आणि आर्किटेक्ट असलेल्या जेष्ठारामभाईंचा मूर्तीशास्त्राचा प्रचंड अभ्यास आहे. कोणतीही मूर्ती संग्रहात जमा झाल्यावर तीचा परिपूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. बरेचदा त्या वस्तूच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीची पुस्तकं खरेदी करावी लागली तरी ते पर्वा करत नाहीत. ‘छंदवेडा’ हा शब्द खऱ्या अर्थाने त्यांना लागू होतो. अत्यंत खर्चिक असणाऱ्या छंदासाठी त्यांना बरेचदा अर्धांगिनीचा रोषही पत्करावा लागला आहे. 
सन १९८०-८१ च्या दरम्यान त्यांनी मुघलनाणी जमवण्यास सुरवात केली. पर्शियन भाषेचा अभ्यास त्यांनी शालांतपरीक्षेच्यावेळी द्वितीय भाषा म्हणून केलेला असल्याने मुघलनाणी वाचतांना त्याचा चांगला उपयोग झाला. पुढे महाराष्ट्र पुरातत्वचे नासिक येथील अधिकारी एस. पी. साठे (सदस्य CSNRI) यांच्याशी त्यांचा संपर्क आला, त्यांनी वेळोवेळी जेष्ठारामभाईंना मार्गदर्शनाबरोबर प्रोत्साहनही दिले. कालांतराने जेष्ठारामभाईंनी नाणी संग्रहाला पूर्णविराम देऊन केवळ कलात्मक वस्तू मूर्तींचा संग्रह आणि अभ्यास सुरू केला. व्यवसायाच्या प्रचंड व्यापातून छंद जोपासायला वेळ काढणं तसं दुरापास्तच, परंतु त्यांनी भल्या पहाटेची वेळ त्यासाठी राखून ठेवली. मूर्तींची शैली त्यांची घडण याचा अभ्यास केला, या अभ्यासामुळेच त्यांच्या संग्रहात वैविध्य आढळते. नासिक, कोल्हापूर, गुजराथ, छत्तीसगड या ठिकाणाहून त्यांनी वस्तू जमा केल्या परंतु नासिकजिल्ह्यातील वस्तूंची संख्या जास्त आहे. पाषाणशिल्प, धातुशिल्प, अडकित्ते, पानदान, करंडे, सुरमादाणी, फणी, कुलूप-किल्ली, गंगाजलाचा गडवा, काचेच्या विविध आकाराच्या बाटल्या आणि आणखी बरच काही त्यांनी जमा केलं. त्यांच्या संग्रहाची प्रशंसा खुद्द कार्ल खंडालवाला यांनीही केली. अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ असा संग्रह समस्त नासिककरांना पाहता/अभ्यासता यावा यासाठी त्यांनी ९५ टक्के संग्रह आपली कर्मभूमी असणाऱ्या नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयास निरपेक्ष भावनेने दान केला. 
- अनिताजोशी, भारतीय विद्या अभ्यासक आणि हस्तलिखित जतनकार, नाशिक 
(anitajoshi14@gmail.com) 
 
पुढील स्लाइडवर वाचा, बटाविया यांच्या संग्रहातील काही मूर्तींची माहिती आणि पाहा फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...